Mon, Jul 13, 2020 01:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : व्हेंटिलेटर अभावी शहापुरातील महिलेचा मृत्यू 

ठाणे : व्हेंटिलेटर अभावी शहापुरातील महिलेचा मृत्यू 

Last Updated: May 25 2020 2:53PM
शहापूर  (ग्रामीण) : पुढारी वृत्तसेवा        

शहापुरात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ झाला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक होणारी वाढ ही प्रशासनाची डोकेदुखी ठरु लागली आहे. दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व क्वारंटाईन करुन ठेवलेल्या व्यक्तींनी कोरोनाचा धसका घेतला असून यात एका ६० वर्षीय वृध्द महिलेला जीव गमवावा लागला आहे. जोंधळे येथील क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या व कोरोनाच्या भितीने प्रचंड घाबरलेल्या त्या वृध्द महिलेला वेळीच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याची घटना शहापुरात घडली आहे.

ही वृद्धा शहापुरातील गोपाळ नगर येथे रहात होती. काही दिवसांपूर्वी जावयाचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या या महिलेला आरोग्य विभागाने जोंधळे येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. कोरोना बाधितांचा वाढत्या संख्येने प्रचंड भयभीत झालेल्या व तब्बल १३ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या या महिलेच्या प्रकृतीत सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक बिघाड झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने शहापुर उपजिल्हा रुग्णालयात आणले.

वाचा : राज्यात कोरोनाग्रस्तांची ५० हजारी पार; एकट्या मुंबईत तब्बल ३० हजार

पण, त्यांना व्हेंटिलेटरविना अर्धा तास रुग्णालयाच्या आवारातच ताटकळत ठेवले होते. त्यामुळे प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. ठाणे येथेही या वृध्द महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनिष रेंगे यांनी सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कांबळे यांचेशी संपर्क केला. त्यानंतर या वृद्ध महिलेला दाखल करुन घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाँ तरुलता धानके यांनी सांगितले. 

वाचा : सीएम योगींच्या 'त्या' निर्णयानंतर राज ठाकरेंकडूनही रोखठोक पलटवार!

दुर्दैवाने सदर वृध्द महिलेवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णाबाबत पुर्वसूचना देऊन सुध्दा वेळीच १०८ रुग्णवाहिका व  व्हेंटिलेटरची व्यवस्था न केल्याने रुग्णालयाच्या आवारातच अर्धा तास थांबवून ठेवल्यामुळे या वृध्द महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नगरसेवक हरेश पष्टे यांनी केला आहे. 
         

आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही.....त्यांच्याशी भेदभाव करु नका, त्यांची काळजी घ्या...." असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मोबाइल धून ऐकू येत असली तरी ही केवळ मोबाईल रिंगटोन रहाता कामा नये. पाॉझिटिव्ह रुग्णांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेणे हे आरोग्य प्रशासनाची नैतिक जबाबदारी असतानाही शहापुरात कोरोनाबाधित रुग्ण व संपर्कातील व्यक्तींना आरोग्य सुविधेच्या उडालेल्या  बोजवाऱ्याचा सामना करावा लागतो आहे. आरोग्य  प्रशासनाकडून वेळीच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध न झाल्याने यात नाहक या वृध्द महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही मोबाइल रिंगटोन न रहाता ती कृतीतून अंमलात येणे आवश्यक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.