Fri, Jul 19, 2019 07:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो-7 कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ६० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

मेट्रो-7 कामामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ६० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:54AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेचे काम पश्‍चिम द्रुतगती मार्गावर करण्यात येत आहे. मात्र या मेट्रो मार्गिकेच्या या कामामुळे पश्‍चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर वाहतूक  पोलिसांच्या मदतीसाठी एमएमआरडीएतर्फे ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

16.5 किलोमीटर लांब आणि 14 स्थानके असणार्‍या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्ग बांधणार्‍या तीन टप्प्यामध्ये हे काम सध्या वेगाने सुरु आहे. 2016 साली या मार्गिकेच्या कामाला सुरूवात करण्यात आली. हे काम पश्‍चिम द्रुतगती मार्गामध्येच करण्यात येत असल्याने या मार्गिकेवरील दोन्ही बाजूची एक-एक मार्गिका या कामासाठी वापरण्यात आली आहे. यामुळे हा मार्ग अरूंद झाल्याने कार्यालयीन वेळेमध्ये या मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक  कोंडी होते. ही वाहतूक  कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक  पोलिसांच्या मदतीसाठी 60 ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

सध्या या मार्गावर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 100 ट्रॅफिक वॉर्डन आहेत. या मार्गिकेचे तीन टप्प्यात काम सुरू असल्याने या तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी 20 ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. या मार्गिकेवर वाहतूक  कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 500 बॅरिकेड्स, 200 वॉकी टॉक, 42 टू व्हीलर आणि 8 क्रेन प्राधिकरणाद्वारे वाहतूक  पोलिसांना पुरवण्यात आले आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक  कमी करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने बेस्टला या मार्गावर जास्त बसगाड्या सोडण्यास सांगितले आहे.