होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या नऊ राज्यांचे मोदी सरकारने ६० हजार कोटी थकवले!

विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या नऊ राज्यांचे मोदी सरकारने ६० हजार कोटी थकवले!

Last Updated: Feb 24 2020 1:29AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशात जीएसटी लागू करताना राज्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भरपाई देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात देशातील नऊ राज्यांची 60 हजार कोटींची नुकसान भरपाई केंद्र सरकारकडे थकीत आहे. याच्या मागणीसाठी दिल्लीवारी करणारे उद्धव ठाकरे हे 9 वे मुख्यमंत्री आहेत. दिल्ली, पंंजाब, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्र या राज्यांची जीएसटी थकबाकी केंद्राकडे आहे. या राज्यांत भाजपेतर पक्ष सत्तेत आहेत.

अधिक वाचा : भीम आर्मीचे मोहन भागवतांना थेट आव्हान!

नोव्हेंबरपर्यंत राज्याचे 15 हजार 588 कोटी रुपये केंद्र सरकारकडे थकबाकी होती. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर 4 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली, तरीही 11 हजार कोटींची थकबाकी कायम आहे. हा आकडा नोव्हेंबरपर्यंतचा असल्याने नंतरच्या चार महिन्यांतील बाकी अंदाजे 15 हजार कोटींच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे, ज्या राज्यात भाजपेतर विरोधी पक्ष सत्तेत आहे त्या राज्यांचा जीएसटी परतावा मोठ्या प्रमाणात केंद्राकडे थकीत आहे.

अधिक वाचा : 'नमस्ते ट्रम्प'ची उत्सुकता शिगेला;२२ किमीचा रोड शो आणि बरचं काही!

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला जीएसटीतील नुकसान भरपाईपोटी 46,630 कोटी रुपयांचा परतावा येणे बाकी होता. यापैकी ऑक्टोबर 2019 पर्यंत फक्त 20,254 कोटी रुपयांचा परतावा मिळाला होता. नोव्हेंबरपर्यंतची ही थकबाकी 15 हजार 558 कोटी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते.

अधिक वाचा : आता सिमकार्डमध्येही डाटा सेव्ह करता येणार! 

दोन हप्त्यांचे थकीत परतावे देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली. त्यानुसार डिसेंबरमध्ये 35,298 कोटी रुपयांचा परतावा केंद्रीय वित्त मंत्रालयाने राज्यांना मंजूर केला. त्यापैकी 4 हजार कोटी रुपयांचा परतावा महाराष्ट्राला मिळाला आहे. मात्र, अद्यापही 11 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि डिसेंबर-जानेवारी या दोन द्वैमासिक हप्त्यांची वाढ झाली आहे. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी केंद्राकडील थकबाकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची भेट घेतली.

अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल

जीएसटीचा परतावा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले आहे. त्यानंतर 4 हजार कोटी मिळाले मात्र 11 हजार कोटी अजूनही बाकी आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांन मोदी भेटीत विनंती केल्याचे स्पष्ट केले आहे. जलदगतीने परताव्याची रक्कम देण्यासाठी आपण सहकार्य करू अशी ग्वाही मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विकासकामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा : 'सनीला बोलवा म्हणजे १ कोटी नक्की येतील'