मुंबई : प्रकाश साबळे
5 एकर बागायती शेतीमध्ये पॉवर ग्रीड कंपनीने बेकायदा खोदकाम करून सर्व्हिस लाइन टाकल्यामुळे सोयबीन, तुर आणि बाभळीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यांची भरपाई मिळावी यासाठी रिसोड तालुक्यातील महागाव येथील रंजना भागवत तेजनकर व भागवत (शास्री) तेजनकर दांपत्य गेल्या 6 वर्षांपासून नुकसान भरपाईसाठी संघर्ष करत आहे. यासाठी त्यांनी तहसीलदारापासून ते थेट राष्ट्रपतीपर्यंत असा गल्ली ते दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला परंतु अद्यापही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.
तेजनकर यांच्या 5 एकर 4 आर.गट क्र 73 शेतामध्ये यांना कुठलीही पुर्वसूचना न देता पॉवर ग्रीड कंपनीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामासोबत खडी शेतात टाकण्यात आली. यामुळे पिकाऊ असलेली शेती गेल्या 6 वर्षांपासून पेरता येत नाही. यामुळे पाठपुरावा सुरू केला. परंतु मरगळलेल्या शासन व प्रशासनाला अद्यापही पाझर फुटत नसल्याची खंत रंजना तेजनकर यांनी व्यक्त केली. न्यायासाठी तेजनकर दांपत्याने 28 मार्च 2017 रोजी राष्टपती भवनाच्या चौकात आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून सोडून दिले. यामुळे आता न्यायासाठी कुणाकडे जायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.