Wed, Jul 24, 2019 02:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अस्तित्वात नसलेले 6277 ‘धनगड’ ठाणे जिल्ह्यात

अस्तित्वात नसलेले 6277 ‘धनगड’ ठाणे जिल्ह्यात

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 1:50AMठाणे : प्रतिनिधी

अस्तित्वात नसलेल्या धनगड जातीचे ठाणे जिल्ह्यात 6 हजार रहिवासी असल्याचा जावई शोध आदिवासी विकास मंत्रालयाने लवला आहे. जिल्ह्यातील धनगड समाजातील व्यक्तीचे पत्ते व माहिती द्या या मागणीसाठी ठाण्यातील धनगर समाज बांधवानी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

धनगर व धनगड एकच असून धनगरांना एसटीचे आरक्षण द्या या मागणीसाठी धनगर समाज गेले 70 वर्ष संघर्ष करत आहे. धनगड ही जातच अस्तित्वात नसून ते धनगर असल्याचे गेले कित्येक वर्ष धनगर समाजाने सरकारला पुराव्यासह दाखले दिले आहेत. तसेच समाजाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली असता धनगड ही जात नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे. मात्र, आदिवासी विकास मंत्रालयाने कुठल्या आधारे 2011 च्या जनगणनेनुसार धनगड जातीचे 6 हजार 277 रहिवासी ठाणे जिल्ह्यात असल्याची आकडेवारी जाहीर केली.

असा सवाल धनगर समाजाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे. जर जिल्ह्यात धनगड समाजाचे रहिवासी असतील तर, त्यांचे नाव आणि पत्ते द्यावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने बुधवारी लेखी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आणि तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे केली. यावेळी धनगर समाजाचे भास्कर यमगर, अ‍ॅड. योगेश चांगण, दीपक कुरकुंडे आदी यावेळी उपस्थित होते.