Tue, Apr 23, 2019 09:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जन्मदातीने घेतला चिमुकलीचा जीव

जन्मदातीने घेतला चिमुकलीचा जीव

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 23 2018 12:58AMकल्याण : वार्ताहर 

दोन मुलांनंतर नको असलेला गर्भ पाडण्यासाठी सासूने दिलेले पैसे पतीने दारुच्या नशेपोटी घालवल्याने तिला तान्हुलीला जन्माला घालावे लागले. त्यातही मुलगी झाल्याने संतापलेल्या जन्मदात्या आईनेच अवघ्या 6 दिवसांच्या चिमुकलीच्या गळ्यावर नखे मारून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरत घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी आरोपी वैशाली प्रधानला अटक केली आहे.  

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथे आरोपी वैशाली आपल्या कुटुंबासह राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  मात्र तिसर्‍यांदा झालेल्या अपत्याचा सांभाळ कसा करायचा या विवंचनेत असलेल्या जन्मदात्या मातेनेच त्या तान्हुल्याच्या गळ्याला नख लावले.

वेदनेने कण्हत असलेल्या या तान्हुलीने एकच हंबरडा फोडला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी धाव घेतली असता हे कृत्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.  त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या त्या तान्हुलीला डॉक्टराकडे नेले मात्र तोपर्यंत तान्हुलीने जीव सोडला होता. 

ठाणे सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांनी या तान्हुलीची गळ्यावर नख मारून हत्या केल्याचा अहवाल देत पोलिसांना पाचारण केले. खडकपाडा पोलिसांनी वैशालीला ताब्यात घेतले असता ही मुलगी 7 महिन्यांतच झाली, ती तशीही जगली नसती त्यामुळे आपण तिचा जीव घेतल्याची कबुली दिल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.

Tags : mumbai, mumbai news, 6-day-old baby, murder, father,