Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये खड्ड्याने घेतला पाचवा बळी

कल्याणमध्ये खड्ड्याने घेतला पाचवा बळी

Published On: Jul 13 2018 1:57PM | Last Updated: Jul 13 2018 1:57PMकल्याण : प्रतिनिधी

कल्याणमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांचा खड्ड्यात तोल जाऊन पडून बळी  जाण्याची जणू काही मालिकाच सुरू झाली आहे. या जीवघेण्या खड्डयांनी आता पर्यंत चार जणांचे बळी घेतल्या नंतर  ना पालिका प्रशासन ना एमएसआरडीसी प्रशासन ना  राज्यशासन जागे झाले. यामुळे यमरूपी खड्डयांची जीव बळी घेण्याची भूक काही कमी झालेली नाही. 

काल आणखी एक  दुर्दैवी घटना कल्याणमध्ये  घडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास गांधारी पूला जवळ खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक दुचाकीस्वार तोल जाऊन खाली पडल्याने पाठीमागून येणाऱ्या कंटेनरखाली  चिरडुन त्याचा जागीच मृत्यू झाला.

दोन दिवसापूर्वी याच रस्तावर पायी चालणारा  अण्णा नावाची व्यक्ती खड्यामुळे तोल जावून खाली पडला याच वेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रक खाली येऊन चिरडली गेली. या अपघातात त्याचा अंत झाला. ही घटना ताजी असताना  गांधारी नजीक नानंकर येथे राहणार कल्पेश जाधव हा तरुण काल मध्य रात्री दोन च्या सुमरास कामा निमित्त आपल्या दुचाकीने गांधारी पुलावरून कल्याणच्या दिशेने येत होता. गांधारी पूल ओलांडताच रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याच्या दुचाकीचा तोल गेला व तो खाली पडला. याच वेळी मागून येणाऱ्या कंटेनरखाली तो चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

खड्ड्याने घेतलेला हा पाचवा बळी 

कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात खराब रस्त्यामुळे एका १२ वर्षाचा विद्यार्थी जेस्लीन कुट्टी हा ट्रक खाली येऊन मयत झाला होता. २ जून रोजी आरोह अत्राले या मुलाचा कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक परिसरात ट्रक खाली येऊन मृत्यू झाला. ७ जुलै रोजी मनीषा भोईर हि महिला शिवाजी चौक परिसरात त्याच ठिकाणी बस खाली येवून मृत झाली हि घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. कल्याण मलंग रोड वरील द्वारली परिसरात खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात वर्षभरा पूर्वी एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  

तब्बल पाच बळी गेल्या नंतर पालिका प्रशासनाने तसेच ‘एमआरडीसी’ने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नाही. काही ठिकणी पडलेल्या खड्ड्यांवर मातीची ठिगळं लावत दुरुस्तीचा देखावा सुरु आहे. मात्र, पावसात ही माती वाहून तेथे पुन्हा खड्डा पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अपघाती मृत्यूंना खड्डेच जबाबदार असून याबाबत दुर्लक्ष करत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या  पालिका प्रशासन तसेच एमआरडीसी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. 

 ‘एमएसआरडी’च्या खराब रस्त्यामुळे अपघात महिला जखमी

एमएसआरडीसीच्या अखत्यारित येणाऱ्या कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातही रस्त्याच्या असमतोलपणामूळे 2 जणांना नाहक जीव गमवावा लागला आहे. आता नेतीवलीच्या मॉल परिसरात अशीच स्थिती निर्माण झाली असून कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या स्वरा गुंजाळ या कल्याण पूर्वेच्या नेतीवली परिसरात असणाऱ्या मॉलमधून बाहेर पडल्या. या मॉलच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला डांबर तर दुसऱ्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. एमएसआरडीसीच्या अखत्यारित येणाऱ्या या मार्गावर काही ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत तर रस्त्याच्याकडेला पेव्हर ब्लॉक लावलेला रस्ता असमतोल झाला आहे. डांबरी रस्ता आणि पेव्हर ब्लॉक यांच्यातील उंच सखलपणामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. याच रस्त्यावरून गुरुवारी रात्री पायी जात असताना स्वरा गुंजाळ यांचा पाय डांबरी रस्ता आणि पेव्हर ब्लॉकच्या मधल्या भागात अडकून मुरगळला आणि त्या खाली पडल्या. त्यावेळी त्यांच्या कडेवर लहान मुलगीही होती. परंतू सुदैवाने त्यावेळी मागून एखादे वाहन येत नव्हते. अन्यथा हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला असता.