Thu, Apr 25, 2019 18:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 500 कोटींचा  भूखंड बळकावण्यासाठी महापालिका आयुक्तांचे नोटिंगच बदलले

भूखंड बळकावण्यासाठी आयुक्तांचे नोटिंगच बदलले

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 10:30AMमुंबई : प्रतिनिधी

‘ध’ चा ‘मा’ झाला आणि पेशवाईत महाभारत घडले. असा ‘ध’ चा ‘मा’ करणारे महाभाग आजही सरकारी कार्यालयात धुमाकूळ घालीत आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भरदिवसा दोघा जणांनी 500 कोटींच्या भूखंडाच्या व्यवहाराशी संबंधित फाईलवरच्या खुद्द महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या शेर्‍यात खाडाखोड करण्याचा पराक्रम केला आहे.  ही बाब सीसीटीव्हीत टिपली गेली असून महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

ही फाईल जोगेश्‍वरी येथील 13674 चौरस मीटरच्या भूखंडाशी संबंधित असून आजच्या बाजारभावानुसार या भूखंडाची किमत सुमारे 500 कोटी इतकी आहे. मूळ निवासी क्षेत्रात असलेला हा भूखंड महापालिकेने रिक्रिएशन ग्राऊंड व हॉस्पिटलसाठी राखीव ठेवला आहे. परंतु महापालिकेने  हा भूखंड कायद्याने निश्‍चित केलेल्या वेळेत ताब्यात घेतला नसल्याचे कारण पुढे करून भूखंड मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही ताबा घेण्याचा कालावधी संपल्याचे दाखवून नोव्हेंबर, 2017 मध्ये मालकाच्या बाजूने निर्णय दिला. सदर भूखंडावर झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण झाले असून भूखंडाचा तेवढा भाग मात्र उच्च न्यायालयाने मालकाकडे सुपूर्द करण्यास नकार दिला.  

सदर बाबीवर महापालिकेच्या कायदा विभागात काथ्याकूट झाल्यानंतर ही बाब महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे निर्णयासाठी गेली. त्यांनी या फाईलवर ‘या प्रकरणात आपण सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले पाहिजे,’(वुई शुड चॅलेंज धीस इन द सुप्रीम कोर्ट) असा शेरा लिहिला. आयुक्तांच्या कार्यालयातून ही फाईल 15 मेरोजी संबंधित डीपी विभागात आली होती. मात्र, 16 मे रोजी दुपारी 1.45 ते 2च्या दरम्यान दोन इसम संबंधीत विभागात आले. त्यावेळी संबंधित टेबलवर कोणी नव्हते. या इसमांनी ही फाईल कपाटातून काढून घेतली व त्यामधील आयुक्तांच्या रिमार्कमध्ये खाडाखोड करीत त्यावर ‘वुई शुडंट चॅलेंज धीस...’ असा बदल केला आहे.