Fri, Mar 22, 2019 22:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून ५० हजार रोजगार निर्मिती - मुख्यमंत्री

‘क्लस्टरच्या माध्यमातून ५० हजार रोजगार निर्मिती’

Published On: Aug 10 2018 7:12PM | Last Updated: Aug 10 2018 7:12PMमुंबई : प्रतिनिधी

सामाजिक उपक्रम म्हणून संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी नागपूर येथील मिहानमध्ये २० एकर जागा देण्याचा निर्णय आज(दि. १० ऑगस्‍ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या संरक्षण साहित्य उत्पादन क्लस्टरच्या माध्यमातून सुमारे ५० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यातील विविध ठिकाणच्या विमानतळ विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीअल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर दहा मधील सुमारे २० एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आला. याठिकाणी विविध संरक्षण साहित्य निर्मिती केली जाणार आहे. त्यातून सुमारे ५० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

शिर्डी  विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू होईल यादृष्टीने कामास गती देण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्र्यांनी पुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) आदी, विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमान सेवा जोडणी योजनेतील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी  सांगण्यात आले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी विमानतळांची कामे सुरू आहेत. यासाठी विविध आवश्यक ती २१  पदे तातडीने भरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. हरीतक्षेत्र असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे ५० हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोन हजार विमानांच्या फेऱ्या झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या मागणीस यावेळी मान्यता देण्यात आली. शिर्डी येथे विमानसेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता शिर्डी विमातळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून सध्याची दोन हजार मीटर लांबीची धावपट्टी ३ हजार दोनशे मीटर करण्यात येणार आहे.