Tue, Aug 20, 2019 15:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीप मोजा ; २३ विरोधी पक्षांची मागणी

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीप मोजा ; २३ विरोधी पक्षांची मागणी

Published On: Apr 23 2019 7:38PM | Last Updated: Apr 24 2019 1:40AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होत असून ईव्हीएम मशीन हे मॅनिप्युलेट करता येऊ शकते. आम्ही अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनचा अभ्यास करत असून यास्वरुपाच्या गोष्टी आम्हाला आढळून आल्या आहेत, असा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती चंद्रबाबू नायडू यांनी दिली.  

पत्रकार परिषदेत बोलताना पुढे चंद्रबाबू नायडू म्हणाले, ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली जात आहे. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांकडूनच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. ज्या देशांकडून ईव्हीएमचा वापर केला जात आहे ते सर्व देश हे विकसनशील देश आहेत. विकसित देशांनी ईव्हीएम यंत्रणा नाकारली आहे. सध्या देशात बॅलटिंग पॉईंट, व्हिव्हिपॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरल्या जात आहेत असे चंद्रबाबू म्हणाले. यावेळी नायडू यांनी सेव्ह द नेशन, सेव्ह डेमोक्रसी या विषयावर मांडणी केली. 

सध्या सत्ताधारी पक्षाकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत असून या स्वायत्त संस्था ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात. याला निवडणूक आयोग ही अपवाद नसल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले,  व्हिव्हिपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत. शिवाय ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणीही तज्ज्ञ नाही. लोकांच्या पैशातून ९ हजार कोटी खर्च केले फक्त ५ वर्षातून एकदा वापरण्यासाठी मत दिल्यानंतर स्लीप मिळण्यासाठी ७ सेकंद लागत आहेत. आम्ही प्रश्न विचारतोय की, एवढा वेळ का लागतो? एक ट्विटर पोल घेण्यात आला त्यात २२ टक्के लोकांनी ७ सेकंद लागल्याचे सांगितले. तर ५५ टक्के लोकांनी ४ सेकंद लागत असल्याचे सांगितले, अशी माहिती चंद्रबाबू नायडू यांनी दिली.

नायडू म्हणाले, जर्मनीमध्ये ईव्हीएम वापरणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इतर विकसित देशांनी ईव्हीएम मशीन नाकारल्या आहेत. २००९, २०१४ आणि आता मी ईव्हीएम विरोधात लढा देत आहे आणि पुढेही देत राहिन असेही चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टिडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे,तृणमुल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, ऑल इंडिया फॉवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एच. फर्नांडिस, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) चे व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे खोरुम ओमर, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल,  डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलानगोवल आदी नेते उपस्थित होते.