Sat, Nov 17, 2018 20:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावत’चा दोन दिवसांत ५० कोटींचा गल्‍ला

‘पद्मावत’चा दोन दिवसांत ५० कोटींचा गल्‍ला

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत प्रचंड वादानंतर अखेर प्रदर्शित झाला. अगोदरच वादाच्या भोवर्‍यात सापडलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल, याविषयी सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु पहिल्या दोन दिवसांत ज्यापद्धतीने चित्रपटाचे कलेक्शन समोर येत आहे, त्यावरून चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल असेच काहीसे संकेत दिसत आहेत. सुपर सिनेमा ट्रेड मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट देशभरात 1500 स्क्रीनवर रीलिज करण्यात आला असून, रीलिजनंतरच्या दोन दिवसांची कमाई आतापर्यंत तब्बल पन्नास कोटी इतकी झाली आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेली सुटी व त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुटीचा चांगला लाभ या सिनेमाला झालेला दिसत आहे. करणी सेनेने या चित्रपटावर आक्षेप घेत या चित्रपटाला तीव्र विरोध केल्यानंतरही या चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये कोणतीही घट झालेली दिसून आली नाही. उलट या नकारात्मक प्रसिध्दीचा पुरेपूर लाभ या चित्रपटाला मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. चित्रपट क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मावत चित्रपटाला पहिल्या दिवशी पंधरा ते सतरा कोटी रुपयांचा गल्ला मिळाला. तर दुसर्‍या दिवशी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने तरुणाईचा ओढा हा चित्रपट पाहण्याकडे होता. 

पेड प्रिव्ह्यू हा नवीन उपक्रम या चित्रपटासाठी राबवण्यात आला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून चार कोटी रुपयांची कमाई करण्यात यश मिळाले आहे. पद्मावत चित्रपटाला पहिल्या आठवड्यात शंभर कोटी रुपयांचा गल्ला मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर पद्मावतच्या निर्मितीसाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च आला. मात्र सुरुवातीपासूनच चित्रपट वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने चित्रपट निर्मितीचा तरी खर्च वसूल करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ज्यापद्धतीने रीलिजच्या नंतरच्या दोन दिवसांचे आकडे आले त्यावरून चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करेल, असेच दिसत आहे.