Thu, Apr 25, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात आरटीईचे ५ हजार ७०० अर्ज मंजूर!

ठाणे जिल्ह्यात आरटीईचे ५ हजार ७०० अर्ज मंजूर!

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 1:41AMअंबरनाथ : राजेश जगताप

आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यालाही नामांकित शाळेत प्रवेश घेता यावा, त्यालाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मोठ्या शाळेत शिकता यावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण हक्‍क कायदा (आरटीई) अमलात आणला. या कायद्यान्वये प्रत्येक शाळेत 25 टक्के प्रवेश हे आरटीईमार्फत दिले जातात. या प्रवेशातील पहिल्या फेरीत ठाणे जिल्ह्यातून तब्बल 5 हजार 702 अर्ज विविध शाळांमध्ये दाखल झाले असून त्यातील 3 हजार 853 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करण्यात आले आहेत. मात्र त्यातही 1 हजार 584 विद्यार्थ्यांनी अर्ज भरूनही प्रवेश घेतला नसल्याचे समोर आले आहे. तर 144 अर्ज बाद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे नामांकित शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हक्‍क कायदा अमलात आणला आहे. इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत  प्रवेश घेण्याकरीता शासनाने सन 2016-17 मध्ये संबंधित शाळेला प्रत्येक विद्यार्थीमागे 17 हजार 670 रुपये अदा केले आहेत. मात्र तरीही अनेक नामांकित शाळा या कायद्याची कोणतीही पर्वा न करता प्रवेश नाकारत असल्याचेही समोर आले आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत शिक्षण हक्‍क कायद्यान्वये विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जातात. या अर्जाच्या पहिल्या फेरीतील शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेश घेतला नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त आहे.