Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

५ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:04AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

एका प्रसिद्ध दर्गाचे ट्रस्टी असून बिनव्याजी 5 कोटींचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करून सहा जणांच्या टोळीने 45 वर्षीय महिलेस 21 लाखाचा गंडा  घातला. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. 

ठाण्यातील मानपाडा जंक्शन येथील सोहम गार्डन येथे राहणार्‍या 45 वर्षीय महिलेस सहा जणांनी आम्ही ठाणे व बारामती येथील मामाभांजे दरगाहचे ट्रस्टी असल्याची बतावणी केली. या ट्रस्टकडून 5 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून या टोळीने संबंधित तक्रारदार महिलेकडून गॅरंटर फी, प्रोसेसिंग फी, व्हेरिफिकेशन फी आदी विविध शुल्काच्या नावाने तब्बल 21 लाख रुपये उकळले. मात्र कुठलेही कर्ज न देता तक्रारदार महिलेचे पैसे हडपले. हा सर्व प्रकार एप्रिल 2015 ते 1 डिसेंबर 2017 या कालावधीत ठाण्यातील वागळे स्टेट येथील मामाभांजे दर्गा कार्यालयात घडला. 

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने श्रीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी स्वतःला दरगाहचे ट्रस्टी म्हणवणारे मोहम्मद सलीम खान कुलाबावाला याच्यासह जयदीप गोखले, शिरीष अय्यर, संजय चव्हाण, प्रमोद आणि शोभा अशा सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

या भामट्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक गरजू लोकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडवल्याचे पोलीस तपासात उघड होत आहे. लोन देण्याच्या नावाने फोन करणार्‍या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.