Thu, Feb 21, 2019 07:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५ मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे!

५ मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे!

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:10AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

दुर्धर आजारांवरील अनेक अवघड शस्त्रक्रिया सहजपणे करण्याचे असाधारण कौशल्य दाखवत अनेक रुग्णांचे जीव वाचविणार्‍या महापालिकेच्या केईएम रुग्णालयात नवीन वर्षांत पाच नवीन मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे उभारण्यात येणार आहेत. त्याचा डॉक्टर व रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून प्रामुख्याने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, बालरोग व प्लास्टिक शस्त्रक्रियेसाठी याचा वापर केला जाणार आहे. यासाठी तब्बल 15 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून केईएम रुग्णालयाच्या स्थापनादिनी 22 जानेवारी रोजी या अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

केईएम रुग्णालयात सुमारे सात वर्षांपूर्वी जनरल सर्जरी विभागात यकृत प्रत्यारोपणास सुरुवात झाली. त्यावेळी या विभागासाठी दोन मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे तयार करण्यात आली होती. त्यानंतर आता केईएमचे अधिष्ठाता व पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या पुढाकारातून नवीन वर्षांत पाच मॉड्युलर शस्त्रक्रियागृहे सुरू करण्यात येणार आहेत.

केईएम रुग्णालयाच्या वर्धापनदिनी 22 जानेवारी रोजी या पाचही मॉड्युलर शस्त्रक्रियागृहांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. पुढच्या वर्षी अशाच प्रकारची शस्त्रक्रियागृहे शीव व नायर रुग्णालयात उभारण्यात येणार असून मूत्रशल्यचिकित्सा व किडनी शस्त्रक्रियेसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जाणार असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले. उपनगरातील भगवती, शताब्दी, तसेच एम. टी. अग्रवाल येथेही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहे उभारण्यात येणार आहेत.