Tue, Sep 17, 2019 22:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निकालाच्या ‘ड्राय डे’साठी राज्यात ४५ विशेष पथके

निकालाच्या ‘ड्राय डे’साठी राज्यात ४५ विशेष पथके

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 1:07AM
मुंबई : गणेश शिंदे

गुरुवारी होणार्‍या लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ड्राय डे साठी महाराष्ट्रात 45 विशेष पथके राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केली आहेत. या दिवशी बेकायेदशीर मद्य विक्री व मद्य तस्करी करणार्‍यांवर विभागाची करडी नजर राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

10 मार्चला निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे राज्यसरकारच्या सर्व विभागाची लगबग सुरु झाली. गणेशोत्सव , 31 डिसेंबर यादिवशी ड्राय डे असतो.कोणत्याही निवडणूकीच्या वेळी उत्पादन शुल्क विभाग मतदान व मतमोजणी दिवशी ड्राय डे घोषित करतो.दरम्यान, कायमस्वरुपी कारवाईसाठी भरारी पथके कार्यरत असतात. लोकसभा निवडणूकीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र 140 पथके केली आहेत. ही पथकेही विविध ठिकाणी कारवाई करत आहेत.यासाठी मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश व छत्तीसगड या राज्यांसह दमण, दादरा या केंद्रशासित प्रदेश अशा 9 ठिकाणी सीमा तपासणी नाक्यावरही वाहनांची तपासणी करतात. 

महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचे निकाल उद्या गुरुवारी (दि. 23) लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादनने राज्यात एकूण 45 विशेष पथके केली आहेत. प्रत्येक जिल्हयात ही पथके कार्यरत असणर आहेत. ही पथके ज्या ठिकाणी कारवाई करणार आहेत, त्याठिकाणचा (घटनास्थळाचा)  पंचनामा करुन  तत्काळ महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये संबधितांवर गुन्हे दाखल करणार आहेत. घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल, त्याचे लायसन्स आहे की नाही, आदी बाबी अधिकारी तपासणार आहेत. ड्राय डे दिवशी ज्यांना अशा प्रकारची बेकायदेशीर मद्य विक्री कोठे  आढळून आली तर त्यांनी 18008333333 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाने केले आहे.

उलवेत कारवाई

रायगड जिल्हयातील उलवे (ता.पनवेल) येथे सोमवारी (दि. 20) अवैध विदेशी मद्याच्या साठ्यासह चारचाकी वाहनांसह एका परराज्यातील इसमास भरारी पथकाने विक्री करताना अटक केली. त्याच्याकडून चारचाकी वाहन, 405 बॉक्स विदेशी मद्यासह सुमारे 27 लाख 85 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रमोद कुमार राधेश्याम तिवारी  असे अटक केलेल्या संशयिताचे नांव आहे.त्याच्या कब्जात हा माल मिळून आला.