Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून ४४५ पुलांचे ऑडिट

आजपासून ४४५ पुलांचे ऑडिट

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी 

अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पादचारी पूल पडून झालेल्या दुर्घटनेचा मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मुंबईतील 445 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिका व रेल्वेने घेतला आहे. यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांसह रेल्वे व पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची 12 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. 

अंधेरीच्या दुर्घटनेची जबाबदारी पालिका व रेल्वे एकमेकांवर ढकलू लागल्यामुळे याची गंभीर दखल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कोर्टानेही घेतली. त्यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची एक विशेष बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन; पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व पालिकेचे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे संचालक  विनोद चिठोरे, पूल खात्याचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी आदी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई पालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्यादरम्यान अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्काय-वॉक आदी प्रकारचे 445 पूल आहेत. या पूलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्‍चरल ऑडिट) शुक्रवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 12 वरिष्ठ अधिकार्‍यांची एक टिम स्थापन करण्यात आली.  या टिममध्ये भारतीय प्रोद्योगिकी संस्थान (आयआयटी मुंबई) येथील तज्ज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे. पूलांचे ऑडिट करताना जे पूल सर्वात जुने आहेत, अशांची तपासणी सुरूवातीला करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ दादर येथील पूर्व पश्‍चिम जोडणारा लोकमान्य टिळक पूल, एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरून जाणारा पूल आदींचा समावेश आहे. दरम्यान महापालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये अधिक चांगले समन्वयन नियमितपणे साधले जावे, या उद्देशाने आता यापुढे दर महिन्याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहणार आहेत.