मुंबईत खड्ड्यांच्या ४,३५१ तक्रारी

Published On: Sep 23 2019 2:04AM | Last Updated: Sep 23 2019 1:53AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत दरवर्षी पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची अक्षरक्ष: चाळण होते. खडबडीत आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून जाताना मुंबईकरांना मात्र मोठी कसरत करावी लागते. यामुळे नागरिकांकडून पालिकेला लक्ष्य केले जाते. यावर्षी मुंबईत खड्ड्यांच्या सुमारे 4,351 तक्रारी पालिकेच्या अ‍ॅपवर नोंदवण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक 350 इतक्या खड्ड्यांच्या तक्रारी पूर्व उपनगरातील भांडुप भागातून नोंदवल्या गेल्या. प्राप्त 4351 तक्रारीपैंकी सुमारे 4001 खड्डे बुजवले असून अवघे 350 खड्डे बुजवणे बाकी असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला. 

यावर्षी मुंबईत पावसाने मुंबईकरांची चांगलीच दैना केली. पावसाळ्याच्या चार महिन्याच्या काळात रस्त्यावर रोज नवे नवे खड्डे तयार होत असे. त्यामुळे मुंबईकरांना पाठ आणि मनक्याचे विविध आजारांना सामोरे जावे लागले. मुंबईकरांना चांगले रस्ते देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्याचे प्रयत्न करताना खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन घेण्याची सुविधा करण्यात आली. यानंतर नागरिकांक़डून सुमारे 4,351 तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यापैकी सुमारे 4001 खड्डे पालिकेने बुजवले असून अवघे 350 खड्डे बुजवणे बाकी असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला. गोरेगाव आणि आसपासच्या परिसरांतील (पी-दक्षिण) 332 नागरिकांनी खड्ड्यांबाबत तक्रारी केल्या असून त्यापैकी 293 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.  

मालाड (313 तक्रारी), कुर्ला (288), अंधेरी पश्चिम (260) विभागातील नागरिकांनी तक्रारी करून रस्त्यांवरील खड्डे पालिकेच्या निदर्शनास आणून दिले. सर्वांत कमी 62 तक्रारी दहिसर भागातून करण्यात आल्या. त्यापैकी केवळ सहा तक्रारींचे निराकरण झालेले नाही. पण प्रत्यक्षात येथेही रस्त्यांवर खड्डे आढळतात.

पालिकेच्या एफ  विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुलाब्यापासून चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या परिसरातील खड्ड्यांबाबत 149 तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्वच तक्रारींचे निराकरण करून खड्डे भरण्यात आले आहेत. पालिकेच्या आकडेवारीवरून हा परिसर खड्डेमुक्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.