होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयावर ‘४२०’ची नजर!

मंत्रालयावर ‘४२०’ची नजर!

Published On: Jun 17 2018 1:36AM | Last Updated: Jun 17 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

मराठी जनतेचं आशास्थान व मानबिंदू असलेल्या मंत्रालयावर आता ‘420 सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांची नजर राहणार असून त्यासाठी 12 कोटींचा खर्च आला आहे. कॅमेरे बसवण्याचे हे काम जवळ जवळ पूर्ण होत आले असून साधारणतः जुलै महिन्यात या सिस्टिमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. विशेष म्हणजे हे सर्व कॅमेरे पॅन, टील्ट, झूम अशा सर्वच अंगानी मंत्रालयाच्या सुरक्षेत मोलाचे योगदान देणार असून ते मुंबई पोलिसांच्या सर्व्हेलन्स सिस्टिमलाही जोडण्यात येणार आहेत. 

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या मंत्रालय परिसरात निर्बंध असतानाही अलीकडच्या काळात काही आंदोलने झाली होती. तसेच, मंत्रालय व मंत्रालय परिसरात नोव्हेंबर,2017 ते फेब्रुवारी, 2018 या कालावधीत तिघा जणांनी आत्महत्या, तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मंत्रालयाची सुरक्षा ऐरणीवर आली होती.  

या तिघांमध्ये धर्मा पाटील(83) या वयोवृद्ध शेतकर्‍याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विषप्राशन केल्यानंतर त्यांना तत्काळ जे. जे. रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने राज्य सरकारला जनतेने धारेवर धरले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात हर्ष रावते(45) या खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगार इसमाने तो रजेवर(फर्लो) असताना मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. 11 नोव्हेंबर, 2017 रोजी 28 वर्षांच्या एका तरुण शेतकर्‍याने शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांचे कारण पुढे करीत सातव्या मजल्यावरच्या खिडकीतून बाहेर पडून  आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. साहजिकच आत्महत्या किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे मंत्रालय हे ‘आत्महत्या पॉइंट’ म्हणून चर्चेत आल्याने प्रशासनावरचे दडपण वाढले होते. त्यातून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा पर्याय पुढे आला होता.  

रावतेंच्या आत्महत्येनंतर मंत्रालयामध्ये काही ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. पण, 2017 मध्ये मंत्रालयात गृहनिर्माण मंत्र्यांना घेराव घालण्याची घटना घडली होती. शिवाय मार्च, 2017 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार्‍या एका शेतकर्‍याला पोलिसांनी बदडल्याने तोही टीकेचा विषय झाला होता. साहजिकच अशा घटनांमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेमधील त्रुटीमुळे राज्य सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. सध्या मंत्रालयात दररोज साधारणतः 3 हजार, तर कॅबिनेट बैठक असते त्यादिवशी साधारणतः 5 हजार लोक आपल्या समस्या घेऊन मंत्रालयात येतात. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्‍न चांगलाच कळीचा मुद्दा ठरला होता. साहजिकच रावतेंच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात जाळ्या बसवण्यात आल्या तरी हाही उपाय पुरेसा नसल्याने सीसीटीव्ही पर्यायाला मोठी चालना मिळाली होती. 

मंत्रालयात बसवण्यात येत असलेल्या 420 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे मॉनिटरिंग करणारी कंट्रोल रूम ही मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर राहणार आहे. शिवाय हे सर्व कॅमेरे पॅन, टील्ट तसेच झूम यासारख्या सर्वच अँगलमधून मंत्रालयावर नजर ठेवणार असल्याने मंत्रालयाच्या तिन्ही इमारतीतील सर्वच काना-कोपर्‍यावर लक्ष ठेवता येणार आहे. या कॅमेर्‍यांमुळे मंत्रालय किंवा परिसरातील होणार्‍या संदेहास्पद हालचाली लगेचच लक्षात येणार असल्याने त्याबाबत उपाय योजनेही प्रशासनाला सोपे होणार आहे.  

अनपेक्षित आंदोलनांवरही राहणार नजर
सीसीटीव्हीच्या 420 कॅमेर्‍यांमुळे पोलिसांना गंभीर परिस्थिती हाताळताना मदत होणार आहे. अभ्यागतांकडून होणार्‍या संशयास्पद हालचालीवर नजर ठेवणे, अनपेक्षित आंदोलन करण्यासाठी येणार्‍या लोकांवरही लक्ष ठेवणे वा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे सोपे होणार आहे. आत्महत्या क रण्याचे प्रयत्न रोखणे अवघड असले तरी प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार असल्याची माहिती माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

घुसखोरांच्या माहितीसाठी सेन्सरही बसवणार
मंत्रालयात जाळ्या बसवण्यात आल्या. त्यानंतर आता सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, इतक्या उपाययोजनांवर प्रशासन समाधानी नसून त्यांनी सुरक्षा उपायश्रेणी (अपग्रेड) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंत्रालयाच्या इमारतीभोवती सेन्सर सिस्टिम बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे घुसखोरीचा प्रयत्न झाला तर सुरक्षा यंत्रणांना तत्काळ सजग होता येणार आहे. सेन्सर सिस्टीमसाठी टेंडरही मागवण्यात आले आहेत. अलीकडेच  केंद्रीय पथकानेही मंत्रालयाच्या सुरक्षेचा आढावा घेऊन काही सूचना केल्या असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.