मुंबईतील 41% आलिशान कार्यालये ओस पडणार!

Last Updated: Jun 07 2020 1:24AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमध्ये बड्या बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून छोट्या कंपन्या आणि स्टार्ट्सअप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या कंपन्यांना कामगारांचे वेतन देणे कठीण झाले असून कार्यालयांचे भाडेही थकले आहे. नरीमन पॉईंटपासून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील आलिशान कार्यालये सोडून बहुतेक कंपन्या छोट्या कार्यालयांमध्ये स्थलांतरीत होण्याच्या तयारीला लागल्या आहे. परिणामी, मुंबई महानगरात भाडेकरूंअभावी पडून असलेल्या रिकाम्या कार्यालयांची टक्केवारी 18 वरून थेट 41 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याशिवाय महानगरातील कार्यालयांच्या भाड्यातही 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कपातीची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते, बीकेसीसारख्या 250 ते 300 रुपये प्रतिचौरस फूट दराने जागा भाड्याने देणार्‍या ठिकाणी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अद्याप भाडे थकल्याची माहिती नाही. मात्र तरीही सप्टेंबर महिन्यापर्यंत लॉक डाऊन व कोरोनामुळे व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती कायम राहण्याची भीती कंपन्यांना भेडसावू लागली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट अशोक नारंग यांनी सांगितले की, त्यांच्या दोन ग्राहकांनी कार्यालये खाली करण्यासाठी जागेचा करारनामा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यातील एका ग्राहकाने अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले होते. 

ऍनॅरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे अध्यक्ष अनूज पुरी यांनी सांगितले की, ज्या कॉर्पोरेट्स पार्कमध्ये एप्रिलमध्ये 97 टक्के भाडेवसुली झाली होती, तिथे मे महिन्यात बुधवारपर्यंत 75 टक्के भाडे वसूल झाले आहे. यावरून मोठे कॉर्पोरेट्स नेहमी कराराचे पालन करतात, हे स्पष्ट होते.

बीकेसीमधील काही जागा मालकांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास त्याचे भयंकर परिणाम सहन करावे लागतील, असेही मत व्यक्त केले आहे. एका जागा मालकाने सांगितले की, बीकेसीमधील मालमत्ता कर आणि इतर खर्च सर्वाधिक आहे. म्हणूनच काही भाडेकरूंमधून येथील कार्यालय सोडून स्वस्तातील जागेत स्थलांतरित होण्याची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊननंतर कंपन्यांमधून खर्चात आणि कर्मचार्‍यांमध्ये कपात केल्याने बहुतेक आलिशान कार्यालये ओस पडण्याची भीतीही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

लॉकडाऊनपूर्वी देशातील महत्त्वाच्या 8 शहरांमधील 8 कोटी 60 लाख चौरस फूट अर्थात 12 टक्के व्यावसायिक जागा भाडेकरूंअभावी पडून होत्या.

मुंबई महानगरातील रिकाम्या पडलेल्या व्यावसायिक जागेचा वाटा हा 1 कोटी 80 लाख चौरस फूट इतका होता.

लॉकडाऊन चार महिने वाढल्यास ओस पडणार्‍या व्यावसायिक जागांचा आकडा 32 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता एका अहवालातून समोर आली आहे.

लॉकडाऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढल्यास देशातील महत्त्वाच्या 8 शहरांमध्ये 22 कोटी 50 लाख चौरस फूट इतकी व्यावसायिक जागा ओस पडण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

बँकिंग आणि वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान कंपन्या (आयटी) आणि त्यांच्याशी निगडीत कंपन्यांना लॉक डाऊनचा मोठा फटका बसला आहे.

याच तीन क्षेत्रांमधील कार्यालयांनी मुंबई महानगरातील 69 टक्के कार्यालये व्यापली आहेत. त्यामुळे आजघडीला 18 टक्के जागा रिकाम्या पडल्या असल्या, तरी सप्टेंबरपर्यंत हा आकडा 41 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.