होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘जेजे’तून 200वर गर्भवती न सांगता पसार!

'या' रुग्णालयातून ४ हजार रुग्ण पळाले!

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 2:06AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

गेल्या साडेचार वर्षांत विविध आजारांवर उपचार सुरू असलेले तब्बल 4 हजारांहून अधिक रुग्ण जे. जे. रुग्णालयातून पळून गेल्याचे समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे. या रुग्णांपैकी 15 रुग्णांवर मानसोपचार सुरू होते. उपचार अर्धवट सोडून रुग्णालयातून पळालेल्या एकूण 3856 रुग्णांमध्ये 2841 पुरुष रुग्णांचा व 1015 महिला रुग्णांचा समावेश आहे. 

2014 मध्ये बालरोग विभागामधील 311 लहान मुले त्यांच्या आईसोबत रुग्णालयाला न कळवता पसार झाली. शस्त्रक्रिया व मेडिसिन विभागामधील गायब झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती मिळवली आहे. सरकारी रुग्णालयातून इतक्या मोठ्या संख्येने उपचार सुरू असलेले रुग्ण गायब होणे ही अत्यंत धोक्याची बाब आहे, असे ते म्हणाले. सरकारी रुग्णालयांत उपचारांसाठी टाळाटाळ होत असल्याने रुग्ण उपचार अर्ध्यावर सोडून पलायन तर करत नाही ना, याची चौकशी करण्याची गरज यामुळे निर्माण झाली आहे. 

सरकारी रुग्णालयांतून दररोज सरासरी एक रुग्ण पलायन करण्याची घटना घडते, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. तर सरकारी रुग्णालयात विनामूल्य उपचार होत असल्याने रुग्ण मोठ्या संख्येने येतात. मात्र, उपचारांसाठी वेळ लागल्यास रुग्ण पळून जाणे पसंत करतात, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.अनेकदा सरकारी रुग्णालयात पूर्णतः विनामूल्य उपचार होतील, असा रुग्णांचा गैरसमज असतो. मात्र दारिद्य्ररेषेखालील रुग्ण वगळता इतर रुग्णांना बेड, विविध चाचण्या व शस्त्रक्रियेचे पैसे द्यावे लागतील, अशी माहिती मिळते तेव्हा ते रुग्णालयाला न कळवता पसार होण्याचा मार्ग निवडतात. 

अनेकदा रुग्ण दारिद्य्ररेषेखालील असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल होतात आणि उपचार करून घेतात व जेव्हा प्रत्यक्षात दारिद्य्ररेषेखाली असल्याचा कागदोपत्री पुरावा दाखवण्याची वेळ येते तेव्हा ते पलायन करतात, असेही सांगण्यात येते. पण 200 हून अधिक गर्भवती महिला देखील रुग्णालयाला न कळवता निघून जातात, तेव्हा मात्र हे कारण कितपत खरे यांची शंका येते.