Sun, Dec 16, 2018 23:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 400 कोटींना फसवणार्‍या समुद्रला अटक

400 कोटींना फसवणार्‍या समुद्रला अटक

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:43AMबदलापूर : वार्ताहर 

मुंबईसह ठाणे आणि पुणे येथे सुमारे 4 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांना 400 कोटींचा गंडा घालणार्‍या सागर इन्व्हेस्टमेंटच्या श्रीराम समुद्रला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. श्रीराम समुद्र याच्यासह त्याची पत्नी अनघा, पुणे येथील कारभार पाहणारा चुलत भाऊ कैवल्य समुद्र आणि काकू सुप्रीती समुद्र यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांनाही कल्याण सत्र न्यायालयाने 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे आणि ठाणे येथील गुंतवणूकदारांना फसवून श्रीराम समुद्र याने पलायन केले होते. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले होते.

काय आहे प्रकरण?

गेल्या 25 हून अधिक वर्ष बदलापुरात सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाने सुहास समुद्र यांनी एक फायनान्स कंपनी काढली होती. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला 26 टक्क्यांपासून व्याज दिले जात होते. यामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई आणि पुणे येथील अनेकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवली होती. मात्र गेल्या  वर्षी मार्चमध्ये या कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळून पळ काढल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. 

कंपनीचे मुख्य संचालक सुहास समुद्र आणि त्यांच्या पत्नी सुनिता समुद्र यांनी यापूर्वीच पोलीस आणि न्यायालयीन कोठडीची हवा खाल्ली आहे. मात्र श्रीराम समुद्र हा पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. सुमारे चारशेहून अधिक कोटी रुपये यामध्ये अडकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आतापर्यंत 38 बँक खाती सील करण्यात आली असून त्यात तीन कोटी रुपये आढळले आहेत. तर विविध 39 प्रॉपर्टी सील करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे 70 कोटींहून अधिक असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.