Mon, Mar 25, 2019 00:01
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई लोकलसाठी ४० हजार कोटी!

मुंबई लोकलसाठी ४० हजार कोटी!

Published On: Feb 02 2018 2:01AM | Last Updated: Feb 02 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

यावर्षीच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना दिलासा देत प्रथमच मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे विस्तारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 150 किलोमीटर लांबीचे नवे मार्ग उभारतानाच उपनगरीय रेल्वे मार्गावर 90 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. या दुपदरीकरणासाठीच 11 हजार कोटी रुपये खर्च होतील. काही विभागांमध्ये उन्‍नत मार्ग उभारण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या दर्जातही वाढ करण्यात येणार आहे. सध्या उपनगरीय रेल्वेमार्गावर 2342 रेल्वेच्या फेर्‍या सुरू असून, त्यामधून 75 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. एकूण 465 किलोमीटरच्या मार्गावर ही सेवा सुरू आहे. मुंबईसाठी नवीन कोणत्याही प्रकल्पाची किंवा नवीन फेर्‍यांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. मात्र, मुंबईच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी भरीव निधी देण्यात आलेला असल्याने मुंबईकरांचा लोकल प्रवास भविष्यात सुखद होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

लोकलचे वेळापत्रक बर्‍यापैकी सुधारणार

मुंबई : प्रतिनिधी 

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करतानाच मुंबईकरांनाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चांगला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उपनगरीय रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. मुंबईतील नवीन प्रकल्पांची निर्मिती करणार्‍या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ने सन 2018-19 च्या अर्थसंकल्पामध्ये एमयुटीपी 3 व एमयुटीपी 3 ए या प्रकल्पातील विविध प्रलंबित कामांसाठी निधीची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. एमआरव्हीसीने त्यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍वनी लोहाणी यांच्यासमोर गेल्या महिन्यात करण्यात आले होते. सादरीकरणामध्ये  हार्बर मार्गावरील गोरेगाव येथपर्यंत असलेल्या सेवेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणे, मध्य रेल्वेच्या मार्गावर कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा मार्ग प्रस्तावित करणे यासह आणखी काही प्रकल्पांचा समावेश होता. मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेवरील वाढता ताण, दररोज वाढणारी प्रवासी संख्या हे लक्षात घेऊन हे सादरीकरण करण्यात आले होते. सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वे प्रकल्प, पनवेल ते विरार नवीन उपनगरी रेल्वे मार्ग या एमयूटीपीत समावेश नसलेल्या प्रकल्पांचा समावेश सादरीकरणामध्ये करण्यात आला होता, अशी माहिती एमआरव्हीसी कडून देण्यात आली.

बोरिवली आणि विरार दरम्यानच्या प्रवाशांचा लोकल प्रवास चांगला होण्यासाठी या दरम्यान  पाचवा-सहावा मार्ग बांधण्यात येणार आहे. बोरिवलीपर्यंतच्या हार्बर विस्तारासाठी 846 कोटी रुपये आणि बोरिवली ते विरार पाचव्या-सहाव्यामार्गासाठी दोन हजार 241 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंतच्या प्रवाशांचा प्रवासही जलद आणि सुकरकरण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. कल्याण ते बदलापूरसाठी तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते आसनगाव साठी चौथ्या मार्गाची योजना असून त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल आणि लोकल गाड्यांचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे. हार्बरवर लोकल फेर्‍या वाढवण्यासाठी सीबीटीसी प्रकल्प, स्थानकांत सुधारणा, लोकल गाड्यांची देखभाल-दुरुस्ती इत्यादी प्रकल्पांचाही समावेश करण्यात आला आहे.

सध्या एमयूटीपी 3 प्रकल्पातंर्गत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. तर गोरेगावपर्यंत काम झालेल्या हार्बर रेल्वेला प्रवासी सेवेत अद्याप आणण्यात आलेले नाही. 

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रकल्प त्वरित मार्गी लावताना मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी त्वरित होणारे आणि व्यवहार्य असणारे प्रकल्प राबवण्याच्या सूचना मध्य, पश्चिम आणि एमआरव्हीसीला केल्या होत्या. गोयल यांच्या सूचनेनुसार चर्चगेट ते वांद्रे उन्नत प्रकल्प गुंडाळण्यात आला. तर सीएसएमटी ते पनवेल उन्नत रेल्वे आणि पनवेल ते विरार नवीन उपनगरी रेल्वे मार्ग प्रकल्प नव्याने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  एमयूटीपी 3 ए अंतर्गत सुमारे  49 हजार 524 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प तयार करण्यात आले आहेत.  हार्बर मार्गाचा  विस्तार बोरिवली पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. 

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तर्फे उपनगरी लोकल मार्गावर विविध प्रकल्प राबवले जातात. याप्रकल्पांचे नियोजन करण्याचे आणि हे प्रकल्प राबवण्याचे महत्त्वाचे काम एमआरव्हीसीतर्फे करण्यात आले. एमआरव्हीसीने 2018-19च्या अर्थसंकल्पामध्येएमयूटीपी-3 ए मधील प्रकल्पांसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीनुसारअर्थसंकल्पामध्ये एमयूटीपी 3 ए मधील प्रकल्पांना निधी उपलब्ध करूनदेण्यात आलेला आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल 40 हजार कोटींची, तर एमयूटीपी3 मधील प्रकल्पांसाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.एमयूटीपी-3 मध्ये एलिव्हेटेड प्रकल्पांचा समावेश आहे.