Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इराणी कबिल्यातून ४० हल्लेखोर पसार

इराणी कबिल्यातून ४० हल्लेखोर पसार

Published On: Aug 19 2018 1:58PM | Last Updated: Aug 19 2018 1:57PMडोंबिवली : वार्ताहर

अब्बासी शाजोर इराणी (22) या गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी आंबिवलीत गेलेल्या उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या पोलिसांवर हिंसक इराण्यांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी दुपारी इराणी कबिल्यात घडली होती. एकीकडे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांची संख्या 8 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पोलिसांनी 37 हल्लेखोरांपैकी हवा असलेला कुख्यात लुटारू अब्बासी याच्यासह त्याची आई सलमा शाजोर इराणी (40) या माय-लेकाला अटक केली आहे. मात्र धरपकडीच्या भीतीने 40 हल्लेखोर इराणी कबिला सोडून परागंदा झाले आहेत.

अब्बासी इराणी हा कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन नजीकच्या इराणी कबिल्यात आला असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी दुपारी या कबिल्यात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अब्बासीला स्वयंपाक घरातून बाहेर काढून पोलिसांनी जीपमध्ये टाकले. वडवली येथील रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांनी जीप थांबवली. हीच संधी साधत पोलिसांच्या मागावर असलेल्या इराणी कबिल्यामधील काही जणांनी जीपवर दगडफेक सुरू केली.  

जमावातील रेखा अफसर हिने स्वतःच्या अंगावर घासलेट ओतून घेतले. याचवेळी पोलीस जीपमध्ये बसलेल्या आरोपीला घेऊन हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी इलेक्ट्रिक पोलला घट्ट पकडून बसलेल्या अब्बासी याच्या मुसक्या बांधल्या आणि पुन्हा जीपमध्ये टाकले. इराणी जमावाने चढविलेल्या सशस्त्र हल्ल्यात पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सपोनि युवराज सालगुडे, फौजदार गणेश तोरगल, जमादार वसंत पाटील यांच्यासह रामसिंग चव्हाण, संजय माळी, जगदीश कुलकर्णी, बाबूलाल जाधव असे सात पोलीस जबर जखमी झाले. हे सर्व जण उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कुख्यात लुटारू अब्बासी इराणी याच्यासह त्याची आई सलमा इराणी, रबाब इराणी, हसन इराणी, नसीम फायद, अली फायद, मेहंदी फायद, सोनिया ऊर्फ टिलू आनंद, अली हसन, रेखा अफसर, अफसर इराणी, सावली इराणी, मरिअम इराणी, बिट्टी पप्पू, सुगी फिरोज, निसार मिस्कीन आणि संजी उर्फ टिल्लू इराणी व इतर 15 ते 20 हल्लेखोरांच्या विरोधात सशस्त्र दंगल माजविल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.