Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ४,०९,६९३ खटले मुंबई जिल्हा न्यायालयात तुंबले 

४,०९,६९३ खटले मुंबई जिल्हा न्यायालयात तुंबले 

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, अशा अर्थाची मराठी म्हण आहे. मात्र, त्याचा पुरेपूर प्रत्यय मुंबईकरांना येत असल्याचे दाहक वास्तव चेतन कोठारी यांनी आरटीआयद्वारा मागवलेल्या मुंबई जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या माहितीवरून येते. सध्या मुंबई जिल्हा न्यायालयांतर्गत विविध न्यायालयांत 409693 इतके खटले प्रलंबित असून त्यापैकी काही खटले 20 वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. मुंबई न्यायालयात सर्वात जुना खटला हा 1973 मधील असून त्यावर आता माझगाव-शिवडी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.  

विशेष म्हणजे कोठारी यांनी मागविलेल्या माहितीवरून मुंबई जिल्हा न्यायालयांतर्गत 73 न्यायालये कार्यरत आहेत. त्याशिवाय अल्पवयीन मुलांसाठी शहर न्यायालय, ज्युवेनाईल सबर्बन 21 वे न्यायालय, अंधेरीतील रेल्वे मोबाइल न्यायालयही मुंबईत कार्यरत आहे. सध्या या न्यायालयांतून चार लाख नऊ हजार सहाशे त्र्याण्णव खटले न्यायाच्या प्रतीक्षेत असले तरी 31 मार्च, 2018 अखेर या खटल्यांची सुनावणी करण्यासाठी अवघे 64 न्यायाधीश होते. तर 11 न्यायालयांमध्ये एकही न्यायाधीश नव्हते! न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण खटल्यांमध्ये 5 ते 10 वर्षे या कालावधीतील 64073 खटले प्रलंबित आहेत. तर 10 वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या आहे 37393. तर, शहर ज्युवेनाइल न्यायालयात 381, ज्युवेनाइल सबर्बन 21 वे न्यायालयात 233, अंधेरी रेल्वे मोबाइल न्यायालयात 6894, उर्वरित सर्व खटले हे 1 ते 73 क्रमांकांच्या विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. 

गत 5 वर्षांत निकालात काढलेल्या खटल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये 2013 मध्ये 219842, 2014 मध्ये 242543, 2015 मध्ये 453759, तर 1 जानेवारी, 2018 ते 31मार्च, 2018 या कालावधीत निकाली काढलेल्या 210390 खटल्यांचा समावेश आहे.