Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 36 मीटरवरील अनधिकृत इमारती होणार अधिकृत

मुंबईत 36 मीटरवरील अनधिकृत इमारती होणार अधिकृत

Published On: Sep 04 2018 8:05AM | Last Updated: Sep 04 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 36 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या अनधिकृत इमारती दंड आकारून नियमित करण्यात येणार आहेत. विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचा रस्ता उपलब्ध असल्यास मुंबईत 36 मीटरपेक्षा जास्त उंचीची बांधकामे अधिकृत (प्रशमित संरचना) म्हणून घोषित करण्यात यावी, असा बदल महाराष्ट्र नगर रचना नियमात सुचविण्यात आला आहे. यासाठी नगरविकास विकास विभागाने नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या असून एका महिन्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

मुंबई पालिकेच्या क्षेत्रात फक्त 36 मीटरपेक्षा जास्त उंचीची बांधकामे दंड आकारून नियमित करता येतील. मुंबईबाहेर मात्र 36 मीटपर्यंत उंची मर्यादित राहणार आहे. ज्या ठिकाणी नियमानुसार रस्ता उपलब्ध असेल अशा ठिकाणी दंड आकारून बांधकामे नियमित करता येतील. कोणत्या  बांधकामांना संरक्षण द्यायचे, त्यासाठी अटी व शर्ती कोणत्या असाव्यात, दंडाची रक्कम आणि  पायाभूत सुविधा शुल्क, विकास शुल्क किती आकारायचे याबाबत निर्णय स्थानिक प्राधिकरणाने घ्यावा, असे सुचविण्यात आले आहे.

शहरी भागातील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्यास 7 ऑक्टोबर 2017 च्या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. मात्र या संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. तसेच शुल्क कमी करण्याची विनंती राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात विचारविनिमय करून नगरविकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात बदल सुचविले आहेत. त्यानुसार अनधिकृत इमारती नियमित करण्यासाठी दंड आकारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना व नियोजन प्राधिकरणांना देण्यात येणार आहेत.