Fri, Jul 10, 2020 20:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रविवारीही मुंबईत ३५७ हॉटेल्स, पब्जवर कारवाई

रविवारीही मुंबईत ३५७ हॉटेल्स, पब्जवर कारवाई

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:35AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीनंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महापालिकेने रविवारी सुटीच्या दिवशीदेखील धडक कारवाई करत  दिवसभरात 616 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलेल्या 357 ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 426 सिलिंडर जप्त करण्यात आले.

या कारवाईमध्ये महापालिकेचे तीनही अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर होते. आबासाहेब जर्‍हाड, विजय सिंघल व आय.ए.कुंदन हे स्वतः रस्त्यावर उतरल्याने या कारवाईचे गांभीर्य आणखी वाढले. मुंबईभर झालेल्या या कारवाईमध्ये 29 हॉटेल्सचा काही भाग तोडण्यात आला. त्यामध्ये 22 एल वॉर्डमध्ये, आर दक्षिण व एस वॉर्डमधील 3 हॉटेल्स व एम पश्‍चिममधील एका हॉटेलचा समावेश आहे. एच पश्‍चिम येथील ऑटर्स क्‍लब, खार जिमखाना, वांद्रे जिमखाना व विलिंग्डन जिमखाना यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई वेळी विभागातील सहाय्यक आयुक्त हजर होते. या संपूर्ण कारवाईवर आयुक्त लक्ष ठेवून होते. 

आजच्या कारवाईसाठी महापालिकेच्या  सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी 3 चमू तयार करण्यात आले होते. या चमूंमध्ये इमारत व कारखाने, अतिक्रमण निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य खाते यासारख्या संबंधित खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश होता.  महापालिकेचे सुमारे 1 हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी आज कार्यरत होते.