Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात वर्षभरात ३५ हजार अपघात,१२ हजार मृत्युमुखी

राज्यात वर्षभरात ३५ हजार अपघात,१२ हजार मृत्युमुखी

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:06AMठाणे : नरेंद्र राठोड

राज्यात सोमवारपासून रस्ते सुरक्षा सप्ताहाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली असून या सप्ताहानिमित्त रस्ता खरंच सुरक्षित आहे का, याचा आढावा घेतला असता अत्यंत भयावह चित्र समोर आले आहे. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार 2017 या वर्षभरात तब्बल 35 हजार 853 एकूण अपघात झाले असून त्यात 12 हजार 264 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 32 हजार 128 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात सर्वाधिक अपघाताचे प्रमाण हे दुचाकीचे असून त्यांची संख्या एकूण अपघाताच्या तुलनेत तब्बल 66 टक्के इतके आहे.

राज्यात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असल्याचे एका शासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. परंतु केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश न ठेवता समाजप्रबोधनातून रस्ते सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे हा या मोहिमेचा उद्देश असावा, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. या रस्ते सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळा व कॉलेजेसमधून मुलांचे प्रबोधन करणे, वाहतुकीचे नियम व त्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगणे, शाऴांमधील परिवहन समित्यांची बैठक घेणे, स्कूल बसेसची तपासणी करणे व मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. 

तर दुसर्‍या टप्प्यात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यात हेल्मेट आणि सीटबेल्ट यांची तपासणी करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, मद्यपान करून गाड्या चालवणार्‍या चालकांवर कारवाई करणे आणि जादा मालवाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करणे यांसारखे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मात्र इतक्या उपाययोजना करूनदेखील खरंच रस्ता सुरक्षित होतोय का? हा प्रश्न शिल्लक राहतोच. याच प्रश्नाचे उत्तर पडताळण्यासाठी रस्ता अपघाताची आकडेवारी मिळवली असता त्यातून रस्ता अजिबात सुरक्षित नसल्याचेच दिसून येते. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात 2017 साली वर्षभरात तब्बल 35 हजार 853 एकूण अपघात झाले असून त्यात 12 हजार 264 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 32 हजार 128 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात सर्वाधिक अपघाताचे प्रमाण हे दुचाकीचे असून त्यांची संख्या एकूण अपघाताच्या तुलनेत तब्बल 66 टक्के इतके आहे. त्यातही 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. 

रस्ते अपघातामुळे देशात सरासरी दर 4 मिनिटाला 1 मृत्यू व साधारण तितकेच लोक गंभीर जखमी होत असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशभरात झालेल्या एकूण अपघातात उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. 

Tags : Mumbai, mumbai news, 35000 accidents, 12000 death, year,