Mon, Jul 13, 2020 01:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धारावीत कोरोनाचे ३४ नवे रुग्ण

धारावीत कोरोनाचे ३४ नवे रुग्ण

Last Updated: Jun 02 2020 1:12AM
धारावी : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या धारावीत गेल्या 24 तांसात 34 नवे रुग्ण वाढल्याने सोमवारी एकूण बाधितांची संख्या 1 हजार 805 झाली आहे. धारावीत कोरोनाचा गुणाकार सुरु झाल्याने राज्य शासन आणि मनपाची धावपळ सुरू झाली असून, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. 

स्थानिक कोरोनाबाधितांवर धारावीतच उपचार करण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्र धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानासमोर उभारण्यात आले आहे. सुसज्ज असलेल्या या केंद्रात 200 खाटांची सोय आहे, 80 खाटांवर ऑक्सिजनची व्यवस्था असून, 10 डॉक्टर, 15 नर्स, 30 वॉर्ड बॉय तीन सत्रांत सेवा देणार आहेत. रुग्णालयात सीसी टीव्ही तसेच प्रवेशद्वारावर थर्मल सेन्सर बसविण्यात आले आहेत. तसेच 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असणार आहे. धारावीतील 5 लाख लोकांना येथे विनामूल्य सेवा मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

आरोग्य केंद्राचा शुभारंभापूर्वी आढावा आरोग्य मंत्र्यांनी घेतला. त्या वेळी अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, सह आयुक्त किरण दिघावकर, प्रभाग समिती अध्यक्ष वसंत नकाशे यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान स्थानिक नगरसेवकाचे प्रयत्न आणि मनपाच्या वतीने विनामूल्य कोरोना आरोग्य शिबिराचे आयोजन धारावीत करण्यात आले होते. त्यात 800 लोकांची कोरोना चाचणी व 13 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली.