राज्यात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण; एका दिवसात ६ जणांचा बळी

Last Updated: Apr 01 2020 8:32PM
Responsive image
आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात बुधवारी कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ३० रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलडाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एका दिवसात ६ जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या आता १६ झाली आहे. 

राज्यात कोरोनामुळे आणखी ६ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. यातील पाच मृत्यू मुंबईत तर १ जण पालघरमध्ये मृत्युमुखी पडला आहे. मुंबईत एका ७५ वर्षीय पुरुष तर दुसरा ५१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.  याशिवाय  पालघर येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू  झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. याशिवाय आणखी ३ जणांचा मुंबईत मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील
मुंबई-१८४
पुणे (शहर व ग्रामीण भाग)- ५०
सांगली-२५    
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा-३६    
नागपूर-१६    
यवतमाळ-४    
अहमदनगर-८    
बुलडाणा-४
सातारा, कोल्हापूर    प्रत्येकी-२    
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी-१    
इतर राज्य - गुजरात- १    
एकूण ३३८ 
त्यापैकी  ४१ जणांना घरी सोडले 
१६ जणांचा मृत्यू    

राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णांलयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६४५६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.