Sun, May 19, 2019 22:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नायर’च्या एमआयआर मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

‘नायर’च्या एमआयआर मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Published On: Jan 28 2018 2:29PM | Last Updated: Jan 28 2018 2:29PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या नायर रुग्णालयामधील एमआरआयच्या मशीनमध्ये खेचला गेल्यामुळे राजेश मारू (वय 32)  या तरुणाचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने वॉर्डबॉयला निलंबित केले असून राज्य सरकारने मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी नायर रुग्णालय प्रशासनाविरोधात भादंवि कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश मारू त्याच्या बहिणीच्या आजारी सासूला पाहण्यासाठी शनिवारी सायंकाळी नायर रुग्णालयामध्ये आला होता. वॉर्डबॉयने  त्याला एमआरआय रूममध्ये जाण्यापूर्वी गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षेसाठी काढून घेतले होते. मात्र, रुग्णासाठी जवळ असलेला ऑक्सिजन सिलिंडर त्याला आत घेऊन जाण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला त्याने विरोध केला मात्र, वॉर्डबॉयने एमआरआय मशीन बंद असून अद्याप सुरू करण्यात आलेले नाही, असे सांगितले.

त्यानंतर राजेश रूममध्ये गेला त्याच क्षणी एमआरआय मशीनमध्ये असलेल्या शक्‍तीशाली लोहचुंबकाने तत्काळ सिलिंडरला आपल्याकडे खेचून घेतले. सिलिंडरला राजेशने पकडले असल्याने तोही या मशीनमध्ये अडकला गेला. त्याचवेळी उच्च दाबामुळे त्या सिलिंडरचे झाकण उघडले गेले आणि त्यातील संपूर्ण वायू राजेशच्या पोटात गेला. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी वॉर्डबॉयच्या मदतीने राजेशला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेरही काढण्यात आले आणि ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकारामुळे मृताचे नातेवाईक संतापले असून दोषींवर जोवर कारवाई होत नाही तोवर राजेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे राजेशच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे नायरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.

याप्रकरणी नायरचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांना फोनवर संपर्क केला असता त्यांनी त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण आणि महिला कर्मचारी सुनिता सुर्वे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह कलम 304 (हलगर्जीपणामुळे मृत्यूला कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनेचे चित्रण झालेले सीसीटीव्ही फुटेज रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, मृत राजेश मारू याच्या कुटुंबासह स्थानिक नागरिक आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा ठिय्या मांडत निषेध आंदोलनाला बसले होते.