Thu, Jul 18, 2019 21:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 32 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

32 जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

Published On: Aug 19 2018 1:41AM | Last Updated: Aug 19 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी 

म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर म्हाडाचा कारभार आता गतिमान झाला आहे. म्हाडाने पुनर्विकासाच्या 32 प्रस्तावांना म्हाडाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

यापूर्वी म्हाडाला विशेष प्राधिकरणाचा दर्जा नसल्याने विविध स्वरूपाच्या परवानग्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता म्हाडाला विषेश प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्याने कामकाजाला आता गती आली आहे. मुंबईमध्ये विविध ठिकाणी म्हाडाच्या एकून 56 वसाहती असून त्यामध्ये 114 लेआऊट्स आहेत. तर काही इमारती विखुरलेल्या स्वरूपात आहेत. या भूखंडांवरील इमारतींच्या पुनर्विकासातून सुमारे 6 ते 8 लाख घरे उपलब्ध होणार आहेत. या इमारती जुन्या झाल्या असून काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे पुनर्विकासाची वाट पाहणार्‍या या इमारतींमधील रहिवाशांना म्हाडाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

म्हाडाकडे पुनर्विकासाचे 89 प्रस्ताव आले होते. म्हाडाने केलेल्या छाननीनंतर सुमारे 32 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.  मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांना देकारपत्र देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर प्रस्तावांना अल्पावधीतच मंजुरी मिळण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. जे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांची छाननी सुरू असून हे कामही अंतिम टप्प्यात आहे.

देकारपत्र मिळाल्यानंतर सोसायट्या किंवा विकासकांना प्रीमियम भरावा लागतो. पुनर्विकासातून उपलब्ध होणार्‍या घरांपैकी शिल्लक राहिलेली घरे म्हाडा लॉटरीसाठी वापरली जातील. त्यामुळे लॉटरीतील घरांचीही संख्या वाढण्यास मदत होणार आहे.