होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसाचे 38 दिवसांत 31 बळी 

पावसाचे 38 दिवसांत 31 बळी 

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 12:50AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात वाहून जाणे, झाडे कोसळणे तसेच विजेचा धक्का बसणे या कारणांनी यंदाचा मान्सून मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून ते 4 जुलै या कालावधीत यासारख्या कारणांमुळे 31 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये वाहून जाण्याच्या घटनेमुळे सर्वाधिक 19 जणांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षी याच 34 दिवसांच्या कालावधीत 23 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यंदा हाच आकडा 8 ने वाढला आहे. यावर्षी या कालावधीत झाड अंगावर पडणे किंवा फांदी पडल्याने 16 लोकांचा जीव गेला आहे. 

मान्सूनशी सामना करण्याची सर्व तयारी झाली असल्याचा दावा मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करत असते. मात्र मृतांचा वाढता आकडा पाहता महापालिकेचा हा दावा किती फोल आहे हे स्पष्ट होते. लोकांच्या वाहून जाण्याच्या प्रकरणांमध्ये कायम निष्काळजीपणा किंवा गटाराच्या खुल्या झाकणांवर खापर फोडले जाते.अशा या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या तक्रारींबाबत प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गुप्ता यांनी नोंदवले आहे. 

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जुहू चौपाटीवर साडेपाचच्या दरम्यान 5 युवक वाहून गेले. यातील वसीम खान (वय 22) या युवकास लाईफगार्डच्या मदतीने वाचवण्यात यश आले. यानंतर शुक्रवारी नाझीर रफिक गांजी, फरदीन फिरोज सौदगर व सोहेल शकील खान या तिघांचे मृतदेह सापडले. शेवटच्या  फैझल सिकंदर शेख याचा मृतदेह शनिवारी सायंकाळी जे. डब्ल्यू मेरियटजवळील समुद्रकिनार्‍यावर सापडला.