Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेचा शॉक : मुंबईत ७३ लाख रुग्णांत ३१% मनोरुग्ण 

पालिकेचा शॉक : मुंबईत ७३ लाख रुग्णांत ३१% मनोरुग्ण 

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:26AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईमध्ये मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षात महापालिकेच्या केईएम, सायन, नायर व कूपर या 4 प्रमुख हॉस्पिटलसह 15 उपनगरीय हॉस्पिटल आणि 175 दवाखान्यांमध्ये येणार्‍या रुग्णांच्या आजाराचे सर्वेेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 73 लाख 74 हजार 602 रुग्णांमध्ये तब्बल 31 टक्के मनोविकाराचे रुग्ण सापडले. 

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या आजाराचा पालिकेने अभ्यास केला आहे. याचा अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला. यात 31 टक्के मनोरुग्णांसह सुमारे 23 टक्के रुग्ण हे रक्तदाब व मधुमेहाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर प्राणीदंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, ताप, जुलाब व मलेरिया या आजारांचा समावेश आहे. मुंबईतील आरोग्य व वैद्यकीय सेवा सुविधांची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी पालिका हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रूग्णांचा अभ्यास करण्यात आला. सायन हॉस्पिटलमधील औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात 51 तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांनी सलग 7 महिने याचा अभ्यास केला. 

या अभ्यासाबाबत बोलताना डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांनी पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुख हॉस्पिटलमधील 5 लाख 78 हजार 886, उपनगरीय हॉस्पिटलमधील 5 लाख 46 हजार 540 आणि मनपा दवाखान्यांमध्ये येऊन गेलेल्या 62 लाख 49 हजार 176 रुग्ण अशा 73 लाख 74 हजार 602 रुग्णांच्या आजाराची माहिती जमा करून त्यावर अभ्यास करण्यात आल्याचे बनसोडे-गोखे यांनी सांगितले. क्षयरोग किंवा एचआयव्ही एड्स सारख्या आजारांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याने त्यांचा या सर्व्हेत समावेश करण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

मनोविकारासाठी मुंबईत स्वतंत्र हॉस्पिटल !

मुंबई महापालिका हॉस्पिटलमध्ये मनोविकार रूग्णांसाठी स्वतंत्र विभाग असून 200 खाटा आहेत. तर 80 डॉक्टर कार्यरत आहेत.  पण रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, मनोविकार रूग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्यासाठी पालिकेत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Tags : Mumbai, 73 million patient, 31% of psychiatric patient, Mumbai news,