Fri, Nov 16, 2018 05:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके!

समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोलनाके!

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:52AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके बसविण्यात येणार आहेत. टोलचे अभ्यासक संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मिळविली आहे. या मार्गासाठी भूसंपादन होण्यापूर्वीच टोलची तयारी करण्यात आल्याचे शिरोडकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

सरकारने विदर्भ व मराठवाड्याला थेट जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडणारा हा महामार्ग करण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील दहा जिल्हे थेट तर 14 जिल्हयांजवळून जोडणारा हा महामार्ग आहे. त्यासाठी परदेशातून गुंतवणुक यावी याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सुरवातीला भुसंपादनाला शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध होता. मात्र नंतर नुकसान भरपाईची रक्कम वाढऊन व लँड पुलींगसारख्या योजना जाहीर करून हा विरोध कसा मावळेल यासाठी राज्य सरकारने पावले टाकली व त्यानंतर तडजोडीने भूसंपासदन सुरू झाले. पुढील दोन महिन्यात यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी 80 टक्के भूसंपादन झाले पाहीजे यादृष्टीने सरकारची पावले पडत आहेत. मात्र या सर्व हालचालीत या महामार्गावर टोलची आकारणी होणार की नाही ? याचा कुठे उल्लेख होत नव्हता. त्यामुळे या क्षेत्रातील कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकारात याची माहिती मागविली होती. समृद्धी  महामार्गावर 31 टोलनाके बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने होणार असल्यामुळे पाच टप्प्यात हे टोलनाके कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 6 व नंतर पुढील पाच टप्प्यापर्यंत अनुक्रमे 7, 8, 2 व 8 असे 31  टोलनाके सुरू करण्यात येणार आहेत.