Thu, May 23, 2019 14:24
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोवंडीत 3 वर्षांच्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले

गोवंडीत 3 वर्षांच्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:26AMगोवंडी : वार्ताहर

गोवंडीच्या शिवाजीनगर विभागात कचरा वाहून नेणार्‍या ट्रकने चिरडल्याने मोहम्मद गौस दस्तगीर अहमद(3) या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. संतप्त रहिवाशांनी चालकासह ट्रकमधील तीन कामगारांना चांगलाच चोप दिला. तसेच ट्रकची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

शिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक 28, 29 च्या मध्यावरून जाणार्‍या रस्ते क्रमांक 4 वर हा अपघात झाला. मोहम्मद हा आपल्या बहिणीसोबत जात असताना देवनार क्षेपणभूमीकडे कचर्‍याने भरलेल्या ट्रकखाली तो आला. जखमी अवस्थेत मोहम्मदला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी चालक गौस मैनुद्दीन शेख(42)याच्यासह ट्रकमध्ये असलेल्या तीन कामगारांना चोप दिला. कचरा वाहून नेणार्‍या वाहनाचीही तोडफोड केली. शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

स्थानिकांनी केलेल्या मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक जखमी असल्याने चौकशीनंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. मोहम्मद  हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. त्याचे वडील दुबईला खासगी कंपनीत नोकरीस आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांचा देखील तिकडे अपघात झाला होता. याच चिंतेत असलेल्या कुटुंबावर आता मोहम्मदच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कचरा वाहून नेणार्‍या वाहनांचा आणि त्यांच्या चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालक नशापान केलेल्या स्थितीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.