Mon, Aug 26, 2019 13:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूमिगत गटाराच्या कामात ३ कामगारांचा मृत्यू

भूमिगत गटाराच्या कामात ३ कामगारांचा मृत्यू

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:45AM

बुकमार्क करा
पवई ः वार्ताहर

पवई आयआयटी गेटसमोर विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर पालिकेच्या भूमिगत गटाराचे काम सुरु असताना क्रेनची वायर तुटून सत्य नारायण सिंग, विश्‍वनाथ सिंग, रामेश्वर सिंग या 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. तर रामनाथ सिंग (48), परत सिंग (49) हे दोन कामगार जखमी झाले आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्‍त होत आहे.

येथील रस्त्यावर पालिकेकडून भूमिगत गटाराचे काम सुरु आहे. 10 मीटर खोल खड्ड्यात क्रेनच्या सहाय्याने उतरुन कामगार काम करत होते. सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान क्रेनच्या बकेटमधून उतरत असताना क्रेनची वायर अचानक तुटून  पाचही कामगार लोखंडी बकेटसह या खोल खड्ड्यात कोसळले. अग्निशमन दलाचे जवान, परिमंडळ दहाचे उपायुक्त पवई पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी या कामगारांना खड्ड्यातून बाहेर काढून घाटकोपरच्या राजवाडी रुग्णालयात उपचासाठी दाखल केले.  यातील 3 कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कंत्राटदाराने कामगारांचा सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.