Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदिवली, चारकोपमधील तीन सिनेमागृहांत बिनधास्त न्या घरचे खाणे-पिणे 

कांदिवली, चारकोपमधील तीन सिनेमागृहांत बिनधास्त न्या घरचे खाणे-पिणे 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेरील खाद्यदार्थ आणण्यास मज्जाव करणार्‍या मल्टिप्लेक्सविरोधात गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही मल्टिप्लेक्स चालकांनी सिनेमागृहात पाण्याची बाटली आणि घरचे खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव केल्यावर मनसेने राज्यातील विविध सिनेमागृहांना चांगलाच दणका दिला. मनसेच्या या दणक्यानंतर नरमाईची भूमिका घेत कांदिवली, चारकोपमधील 3 सिनेमागृहांनी प्रेक्षकांना घरचे पदार्थ आत नेण्यास रविवारपासून बिनशर्त परवानगी दिली. तसेच खाद्यपदार्थ नेण्यास मनाई केल्यास तात्काळ मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती द्या, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पुण्यानंतर कांदिवलीतल्या चारकोप परिसरातील मिलाप पीव्हीआर, रघुलीला आयनॉक्स आणि सिनेमॅक्स पीव्हीआर या तीन मल्टिप्लेकसच्या प्रशासनाला  शनिवारी मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी यासंदर्भात एक पत्र पाठवले. या पत्राद्वारे प्रेक्षकांना पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास मज्जाव करू नये, असा इशारा दिला होता. सोबतच सिनेमागृहातील पाणी आणि इतर खाद्यपदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किंमती कमी करण्याचीही तंबी दिली होती.मनसेचे हे पत्र हाती पडल्याबरोबर कांदिवलीतील 3 सिनेमागृहांत खाद्यपदार्थ आणि पाणी घेऊन जाण्याची परवानगी प्रेक्षकांना देण्यात आल्याची माहिती साळवी यांनी दिली. तर सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीबाबत व्यवस्थापकाशी चर्चा करून त्या 3 दिवसांत माहिती देऊ, असे आश्वासन सिनेमागृह व्यवस्थापकांनी दिल्याचेही साळवी यांनी सांगितले.दरम्यान सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची किमत तीन दिवसांत कमी झाल्या नाही, तर मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल, असेही साळवी यांनी सांगितले आहे.