Sun, May 26, 2019 01:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘एक्स्प्रेस-वे’वर मुंबईचे ३ विद्यार्थी ठार 

‘एक्स्प्रेस-वे’वर मुंबईचे ३ विद्यार्थी ठार 

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:12AM

बुकमार्क करा
खोपोली/ खालापूर : प्रतिनिधी 

लोणावळा येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी चाललेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर धामणी नजिक भीषण अपघात होऊन 3 ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 1 मुलगा आणि 2 मुलींचा समावेश आहे. या अपघातात मृत आणि गंभीर जखमी झालेले विद्यार्थी हे  मुंबईतील कुर्ला, ठाणे, गोवंडी येथे राहणारे होते. मौजमजेसाठी चाललेल्या विद्यार्थ्यांच्या अशा झालेल्या दुर्देवी मृत्युमुळे तिन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला, ठाणे व गोवंडी येथे राहणारे आणि वाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी लोणावळा येथे पिकनिकला निघाले होते. इनोव्हा आणि पोलो कार अशा दोन गाड्यांमधून विद्यार्थी लोणावळ्याच्या दिशेने मुंबई- पुणे  द्रुतगती मार्गावरून भरधाव निघाले असताना, सकाळी 9.30 च्या सुमारास खालापूर हद्दीत धामणी नजीक पोलो कार क्र.आर जे 21 सी.बी.0833 या कार ओव्हरटेक करुन पुढे जात असताना समोर उभ्या असलेल्या टेम्पोवर जोरदार धडकल्याने कारचा अक्षरशः चक्‍काचूर झाला. त्यात अनास शेख (19), स्वेदा दुबे (19)  यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेली श्रद्धा मौर्य (19) हिचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. कारमधील गंभीर जखमी रिजवान व निलेश (पूर्ण नाव समजले नाही) यांना तातडीने उपचाराकरिता एमजीएम रुग्णालय कामोठे येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

खोपोली धामणी भागात दोन महिन्यात 20 ते 25 अपघातांची मालिका पहायला मिळत असून या अपघातांमुळे महामार्गावरील प्रवास हा धोकादायक झाला आहे. मंगळवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे भावी डॉक्टरच अपघातात मृत झाल्याची घटना घडली. पै-पैसा साठवून मुलाच्या शिक्षणासाठी झटणार्‍या पालकांना यामुळे मोठा धक्‍का बसला.