Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीसाठी यंदा ३ लाखांवर जागा

अकरावीसाठी यंदा ३ लाखांवर जागा

Published On: May 23 2018 1:58AM | Last Updated: May 23 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विभागात एमएमआरडीए क्षेत्रात महाविद्यालयांमध्ये अकरावीकरिता तिन्ही शाखा मिळून सर्व कोट्यानिहाय 3 लाख 1 हजार 760 जागा यंदाच्या प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा 14 नवीन महाविद्यालये वाढली आहेत. गतवर्षी तब्बल 55 हजार जागा रिक्‍त राहूनही यंदा नव्याने 10 हजार जागांना शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाला प्रारंभ होणार आहे. आता दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी नोंदणी स्वरुपात अर्ज भरत असले तरी प्रत्यक्ष प्रवेशाला निकालानंतर सुरुवात होणार आहे. मुंबईमधील नामवंत महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. पालक-विद्यार्थ्यांना चिंता लागते ती प्रवेशाची. कोणत्या महाविद्यालयात किती जागा आहेत.

जागा वाढल्या की आपला प्रवेश होईल असे पालकांना वाटत असले तरी नामवंत महाविद्यालयांतील जागांत वाढ कधी  झाली नाही. नामवंत महाविद्यालये नवीन तुकड्यांना मान्यता घेत नाहीत. दरवर्षी मात्र  शालेय शिक्षण विभागाकडून स्वयंअर्थसहाय्य माध्यमातून नव्या महाविद्यालय तसेच तुकड्यांना मान्यता देवून जागांची वाढ दिली जाते. या वाढीव जागावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नसताही दरवर्षी या जागा वाढताना दिसत आहेत. यामुळे अकरावीच्या रिक्‍त जागांचा आकडा दरवर्षी फुगत असल्याचे दिसत आहे.

मुंंबईत सर्वाधिक मागणी असलेल्या गतवर्षीपेक्षा यंदा वाणिज्य शाखेत 4 हजार 460 जागांची वाढ झाली आहे. तर कला शाखेत केवळ 1 हजार 140 जागा वाढल्या आहेत. तर विज्ञान शाखेत 3 हजार 760 जागा वाढल्या आहेत. कला शाखेसाठी एकूण 35हजार 320 विज्ञान शाखेकरिता 94 हजार 770 तर वाणिज्यकरिता 1लाख 65 हजार 330 आणि एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) 6340 अशा सर्व मिळून 3 लाख 1 हजार 760 जागा 786 महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. 

मुंबई, रायगड, ठाणे मध्ये 14 कनिष्ट महाविद्यालयाना स्वंयअर्थसहाय्य मधून मान्यता मिळाल्याने यावर्षी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या एकूण 1 लाख 63 हजार 946 जागा उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या मध्ये  4 हजार 264 जागांची भर पडली आहे. अकरावी ऑनलाईन  प्रवेशासाठी कोट्याव्यतिरिक्‍त शाखानिहाय प्रवेशक्षमता कला शाखेकरिता 20,326 वाणिज्य करिता  87,285 आणि विज्ञानकरिता 52,436 इतकी आहे.