Sun, Aug 25, 2019 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून  23  जणांची फसवणूक

म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून  23  जणांची फसवणूक

Published On: Feb 03 2018 2:43AM | Last Updated: Feb 03 2018 2:26AMमुंबई ः प्रतिनिधी

म्हाडाचे घर देतो असे सांगून 23 जणांची फसवणूक केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. या सर्वांना सुमारे अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पळून गेलेल्या तिघांना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये प्रणव विलास पाटील, दिपेश अशोक आंगले व प्रतिक सुहास पाटील यांचा समावेश असून तिघांनाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

तक्रारदार महिला ही साकिनाका परिसरात पतीसोबत राहते. काही महिन्यांपूर्वी गडकरी नाट्यगृहात तिची प्रणव पाटील याच्याशी ओळख झाली होती. आपण नाट्यनिर्माता तसेच मराठी अभिनेता असल्याचे त्याने त्यांना सांगितले होते. त्याची वहिणी म्हाडामध्ये कामाला आहे तर वडिल म्हाडाचे घर मिळवून देण्यात अनेकांना मदत करत असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदार त्याच्या संपर्कात होत्या. याच दरम्यान त्याने त्यांना म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगितले. घराची गरज असल्याने त्यांनी म्हाडाच्या घरासाठी त्याला सुरुवातीला वीस लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने त्यांना घोरबंदर येथील चिकुजीनीवाडीतील एका इमारतीत नवव्या मजल्यावर त्यांना म्हाडाचे घर अलोट झाल्याचे सांगून त्यांना घर अलोट झाल्याची कागदपत्रे दिली. मात्र मुदतीत त्याने घराचा ताबा दिला नाही.याच दरम्यान त्यांना प्रणवसह त्याचे दोन सहकारी दिपेश आणि प्रतिक यांनी अन्य बावीसजणांकडून म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये घेतल्याचे समजले.  त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीसह अन्य भादवि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेले होते. 

अखेर या तिघांनाही साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सध्या ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतरही काही आरोपींचा सहभाग आहे का, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.