Mon, Apr 22, 2019 15:41



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

वर्षभरात पालिकेचे २८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Published On: Dec 17 2017 3:04AM | Last Updated: Dec 17 2017 2:26AM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेची भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणून गेल्या काही दिवसांत ओळख झाली आहे. पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयाबाहेर लाच घेणे व देणे गुन्हा असल्याचे फलक ठळकपणे लावण्यात आले आहेत. तरीसुध्दा गेल्या वर्षभरात महापालिकेतील 28 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले. यात शिपायासह अभियंता, लिपिक व अधिकार्‍यांचा समावेश आहे. 
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडलेल्या सहाय्यक अभियंता अनिल मिस्त्री यांच्यासारखे पालिकेत हजारो मिस्त्री सापडतील. पण प्रत्येकावर कारवाई करणे शक्य नाही.

पालिकेतील असे एक खाते सापडणार नाही की तेथे भ्रष्टाचार होत नाही. त्यात विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभाग तर भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. त्याशिवाय इमारत प्रस्ताव, विकास नियोजन, रस्ते, जलअभियंता, नगरअभियंता, विधी एवढेच काय तर, सुरक्षा खाते व अग्निशमन दल व आरोग्य विभागावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. एवढेच नाही तर या विभागातील अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. कडक शिस्तीचे आयुक्त अजोय मेहता यांनी भ्रष्ट कंत्राटदारांसह मुख्य अभियंता यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली थेट तुरूंगात पाठवले. त्यामुळे पालिकेतील भ्रष्टाचार कमी होईल असे वाटत होते. पण सहाय्यक अभियंता अनिल मिस्त्री यांची बेहिशोबी मालमत्ता पाहिल्यावर पालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात तब्बल 28 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले. यात दोन हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत लाच स्वीकारणार्‍या सफाई कामगारांसह शिपाई, लिपिक अधिकार्‍यांचा समावेश आहे. जानेवारी 2017 मध्ये महेेंद्रप्रताप यादव या स्वच्छता निरीक्षकाला 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. जून 2017 मध्ये दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना इमारत व कारखाना विभागाचे दुय्यम अभियंता शैलेश गौड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

ऑक्टोबर 2017 मध्ये सफाई कामगार बाळू रेड्डी व लिपिक प्रवीण श्रोत्रीया यांना 5 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. राजावाडी हॉस्पिटलचिा टाईमकीपरही 2 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला होता. 

मरोळ बसडेपोचा लाचखोर व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : प्रतिनिधी

अंधेरीतील मरोळ बसडेपोमध्ये असलेल्या कॅन्टीन चालकाकडून 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी व्यवस्थापक आदेश चंद्रदास खरे (57) याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. कॅन्टीनचा नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी खरे याने ही लाच मागितली होती.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील मरोळ बसडेपोमध्ये भावाच्या नावावर असलेले कॅन्टीन चालविण्याचे काम तक्रारदार 36 वर्षीय तरुण करतो. कॅन्टीनमधील सर्विस आणि खाद्यपदार्थांचा दर्जा याबाबत वरिष्ठांना नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी लाचखोर खरे याने या तरुणाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. 

तक्रारदार तरुणाने एसीबी मुख्यालय गाठून याबाबत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने केलेल्या चौकशीत लाचखोर खरे हा पैशांची मागणी करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार खरेविरोधात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.