Fri, Jul 03, 2020 04:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात एका दिवसात २७३ जणांचा कोरोनाने मृत्यू; सर्वांधिक १२३ मृत्यू एकट्या महाराष्ट्रात!

देशात एका दिवसात २७३ जणांचा कोरोनाने मृत्यू; सर्वांधिक १२३ मृत्यू एकट्या महाराष्ट्रात!

Last Updated: Jun 05 2020 5:56PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. दरदिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत उच्चांकी नोंद होत आहे. लागोपाठ चौथ्या दिवशीही सर्वांधिक रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या दिवसभरात वेगवेगळ्या राज्यात तब्बल ९ हजार ८५१ कोरोनाबाधित आढळून आले. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्येने त्यामुळे सव्वा दोन लाखांच्या टप्पा ओलांडला आहे. याच वेगाने कोरोनाबाधितांचा आलेख वाढला, तर येत्या एक ते दोन दिवसांमध्ये सर्वांधिक कोरोनाग्रस्त देशाच्या यादीत इटलीला मागे टाकत भारत सहाव्या क्रमांकावर पोहचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इटलीत सध्या २ लाख ३४ हजार ०१३ कोरोनाबाधित आहेत.
 
शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दिवसभरात १० हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची भर पडली तर, पहिल्यांदाच सर्वांधिक २७३ रूग्णांचा मृत्यू झाला. यातील उच्चांकी १२३ मृत्यू एकट्या महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा लागोपाठ वाढत असल्याचे दिसून आले आहे.

देशात ४८.२७ टक्के कोरोनामुक्तीच्या दराने गेल्या दिवसभरात ५ हजार ३५५ नागरिकांना विविध रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. यातील १ लाख १० हजार ९६० रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, ६ हजार ३४८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ९ हजार ४६२ नागरिकांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) गुरुवारी देशात उच्चांकी १ लाख ४५ हजार नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. यापूर्वी आयसीएमआरने १ लाख ३९ नागरिकांचा एकाच दिवशी तपासणी करण्याचा विक्रम केला होता.
 
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यात देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज सरासरी ४.८ टक्क्यांनी वाढत आहे. पंरतु, कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण हे १३ ने वाढून १६ दिवसांवर पोहोचले आहे. २४ मार्चला देशात घोषित करण्यात आलेल्या जनता संचारबंदीच्या वेळी रूग्णसंख्या दर ५.२ दिवसांनी दुप्पट होत होती. देशातील १३ राज्य असे आहेत ज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५०० हून अधिक आहेत. या राज्यांमध्ये कोरोना वाढण्याचा दर राष्ट्रीय दराहून बराच कमी आहे. त्रिपुरात (४.३), आसाम (५.५), छत्तीसगढ (६.१), हरियाणा (६.२), कर्नाटक (८.९), जम्मू-कश्मीर (१०.९), उत्तराखंड (११.४), झारखंड (११.४), दिल्ली (११.५), केरळ (११.६), पश्चिम बंगाल (१२), ओडिशा (१२.९) तसेच ​तामिळनाडूत (१४.१) हा दर कमी नोंदवण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांतील रूग्णसंख्येवरून हा दर समोर आला आहे. एकादिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांची संख्या ७९ असलेल्या गोव्यात ८७ नवीन रूग्ण आढळले आहेत. याचप्रकारे दादर नगर हवेलीत आठ कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चार नव्या रूग्णांची भर पडली आहे. 

आरोग्य मंत्रालयातील संचालकांना कोरोना 

नवी दिल्लीतील केंद्रीय आरोग्य मंत्रालयात संचालक पदावर कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी तीन अधिकाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला होता. यानंतर गुरुवारी मंत्रालयाकडून कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आले होते. उद्या, शनिवारी तसेच रविवारी मंत्रालयाच्या इमारतीला सॅनिटाईज करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचे आदेश त्यामुळे देण्यात आली आहे. महारोगराईच्या संकटकाळात मंत्रालयात गेल्या चार महिन्यांपासून सुटीच्या दिवशी देखील काम सुरु आहे.