Wed, Nov 21, 2018 17:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घटस्फोटित, विधवांच्या मुलांना आरटीई २५ टक्क्यांतून प्रवेश

घटस्फोटित, विधवांच्या मुलांना आरटीई २५ टक्क्यांतून प्रवेश

Published On: Jan 18 2018 11:04AM | Last Updated: Jan 18 2018 11:04AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के कोट्यात घटस्फोटित, विधवा महिलांच्या बालके तसेच अनाथ बालकांना आता प्रवेश मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातील नवे नियम जारी केले आहेत. 2018-19 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही शासन निर्णयात नमूद केले आहे. जूनपासून सुरू होणार्‍या प्रवेशप्रक्रियेंतर्गत नर्सरी किंवा पहिलीच्या प्रवेशासाठी पालकांनी 24 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आरटीआईअंतर्गत ऑनलाईन माहिती भरताना बालकाचे चुकीचे नाव किंवा आडनावातील किरकोळ चुकांमुळे शाळा प्रवेश नाकारू शकत नाही. त्याचबरोबर सर्व शिक्षणाधिकारी यांना क्षेत्रातील सर्व शाळेच्या यादी आणि ऑनलाईन प्रक्रियेचा तपशील वृत्तपत्रात बातमीद्वारे जाहीर करावा लागणार आहे. आरटीईअंतर्गत असणार्‍या शाळांना आरटीईबद्दल माहितीचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे.