Sat, Aug 17, 2019 16:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २५% पालकांनी तक्रार केल्यास फीवाढीची दखल

२५% पालकांनी तक्रार केल्यास फीवाढीची दखल

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:14AMमुंबई : प्रतिनिधी

खासगी शाळांत आकारली जाणारी फी जास्त असल्याची तक्रार जर 25 टक्के पालकांनी केली, तर त्याची दखल घेण्यात येईल. शुल्क नियंत्रण समिती या तक्रारींची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना तावडे बोलत होते.

सध्याच्या कायद्यातील त्रुटींकडे लक्ष वेधत भातखळकर यांनी, केवळ पालक-शिक्षक समितीने तक्रार केल्यासच शुल्क नियंत्रण समिती त्याची दखल घेते. त्याऐवजी अन्य पालकांनाही तक्रार करण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली. शैक्षणिक साहित्याच्या खरेदीची केली जाणारी सक्‍ती रद्द करण्यात यावी व केंद्र सरकारने शाळांच्या ग्रेडेशनसाठी जे पोर्टल सुरू केले आहे, त्यावर अनेक खासगी शाळांनी नोंदणीच केली नाही ते करण्याची सक्‍ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. मनीषा चौधरी, सीमा हिरे यांनीही उपप्रश्‍न विचारले. खासगी शाळांकडून आकारण्यात येणार्‍या भरमसाट फीबाबतच्या अनेक तक्रारी सदस्यांनी मांडल्या.

तावडे यांनी खासगी शाळांकडून आकारण्यात येत असलेल्या फीसंदर्भात  नेमलेल्या माजी न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. सध्याच्या कायद्यात पालक-शिक्षक संघाने तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाते. येत्या शैक्षणिक वर्षापासून 25 टक्के पालकांना हा अधिकार देण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाचे बाजारीकरण होऊ देणार नाही. शुल्क नियंत्रण समिती या तक्रारींची दखल घेऊन त्यांची सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्‍ती केली जाते ती पालक -शिक्षक संघाच्या मान्यतेशिवाय करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.