Wed, Jan 16, 2019 21:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडकोची वर्षअखेरपर्यंत आणखी 25 हजार घरांची योजना

सिडकोची वर्षअखेरपर्यंत आणखी 25 हजार घरांची योजना

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाची (सिडको) पुढील वर्षी 25 हजार घरांची योजना असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

सिडकोच्या 14 हजार 838 परवडणार्‍या घरांच्या ऑनलाईन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे.2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्र राज्याने 6.50 लाख घरे बांधून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. म्हाडाला पीपीपी योजनेतून 1 लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही 14 हजार घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किंमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत.

यंदाच्या घरांच्या योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश केला आहे. या लॉटरीतील अर्जांची योग्य प्रकारे छाननी करून गरजू नागरिकांनाच घरे मिळतील, याची दक्षता घ्यावी. सामान्य माणसांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.