Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात एकाच दिवशी तब्बल २३४ शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात  

ठाण्यात एकाच दिवशी तब्बल २३४ शाळाबाह्य मुलं शिक्षण प्रवाहात  

Published On: Jul 20 2018 8:56PM | Last Updated: Jul 20 2018 8:56PMठाणे : प्रतिनिधी                  

शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शालाबाह्य मुलांची शोध मोहीम हाती घेतली असून एका दिवसात तब्बल २३४ शाळाबाह्य मुलांना शोधून शाळेत दाखल करण्याची किमया केली आहे.  

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी पर जिल्ह्यातून हंगामी वास्तव्यास कुटूंबच्या कुटूंब येतात. या कुटूबांमध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. मात्र या स्थलांतरामुळे कुटूंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते. ही बाब लक्षात घेऊन यंदा शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करण्याची संकल्पना शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) संगीता भागवत यांनी मांडली.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ सर्व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेवून पूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन तात्काळ नजीकच्या शाळेत प्रवेश देण्याबाबत गटस्तरावरील व जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा व सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार दिनांक २९ जुन २०१८ हा दिवस शाळाबाह्य मुलांचा शोध मोहीम दिवस म्हणून निश्चित करून शिक्षकांच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला.  

शोध घेण्यात आलेली मुले ही ठाणे जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या, दगडखाणी, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, होटेल्स व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कुटूंबातील मुले असल्याचे शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सागितले.

शाळाबाह्य मुलांसाठी ‘बालरक्षक’

राज्य शासनाने प्रत्येक मुल शिकलं पाहिजे हे धोरण अवलंबले असून जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ९ जानेवारी २०१७ नुसार 'बालरक्षक' ही संकल्पना पुढे आली. बालकांच्या समस्या समजुन उपाययोजना करणे, बालकाची मुलभूत क्षमता प्रभुत्व पातळीपर्यंत विकसित करण्यास मानवीय दृष्टीकोनातून शिक्षण देणारी, झपाटून काम करणाऱ्या शासन व्यवस्थेतील व्यक्तीला बालरक्षक असे नाव देण्यात आले आणि या बालरक्षक व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन ठाणे जिल्ह्यात शालाबाह्य मुलांची शोध मोहीम यशस्वीरीत्या राबवली गेल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सागितले.  

दिव्यांग मुलही शिक्षणाच्या प्रवाहात

या मोहिमेत विद्यार्थ्याचा शोध घेऊन तात्काळ नजीकच्या शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात आला. या शोध मोहिमेत आढळून आलेल्या ३ दिव्यांग विद्यार्थांना ही शालेय प्रवेश देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. या मोहीमेत उस्फुर्त पणे काम करणारे शिक्षक, १३७९ बालरक्षक व समग्र शिक्षा अभियानाची सर्व टीम, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती प्रभारी बालरक्षक समन्वयक अनिल कुऱ्हाडे यांनी दिली.