Wed, May 22, 2019 10:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इन्शुरन्स बोनसच्या नावाखाली २२ जणांना गंडा

इन्शुरन्स बोनसच्या नावाखाली २२ जणांना गंडा

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 12:43AMमुलुंड : वार्ताहर

इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत आणि बोनसचे पैसे हवे असल्यास रोख रक्कम देण्याची मागणी करीत अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या एका टोळीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. टोळीने आतापर्यंत राज्यातील 22 जणांना  अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे निष्पन्न  झाले आहे.

राकेश शिंदे(31), रमेश उगले(30), मुरलीधर देशमुख (27), कुमार मालुसरे(25), आकाश चिखले(26), राजेश मकदूम(33), संजय मानकर(27) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी भागात रहाणारे आहेत. 

मुलुंड पोलीस ठाण्यात राजशेखर हरिश्चंद्र उजगरे(70) या डॉक्टर फिर्यादीने  इन्शुरन्स बोनसच्या नावाखाली चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. फिर्यादीला भारती अक्सा लाईफ सेक्युअर इन्कम प्लॅनच्या पॉलिसीची माहिती सांगून पॉलिसीवर 9 लाख 46 हजार रुपयांचा बोनस आला असल्याचे सांगण्यात आले होते. फोन केलेल्या व्यक्‍तीने दिलेली पॉलिसीची माहिती तंतोतंत असल्याने फिर्यादीने चार लाख रुपये मॅच्युरिटी रक्कम वाढवणे, रक्कम खात्यावर वर्ग करणे आणि प्रोसेसिंग फी आणि आयकर या कारणासाठी टप्प्याटप्प्याने दिली होती. बोनस न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने मुलुंड पोलिसात धाव घेतली होती. 

मुलुंड पोलिसांनी रोख रक्कम घेऊन जाणार्‍या, कॉल करणार्‍यांचा शोध घेऊन आरोपींना गुहागर रत्नागिरी इथून अटक केली. परिमंडळ सातचे पोलीस आयुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीपाद काळे, निरीक्षक प्रकाश वारके, सपोनि महेंद्र  पुरी यांच्या पथकाचे अभिनंदन केले.