Wed, May 22, 2019 15:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलाब्यातील वयोवृद्धेला घातला 22 लाखांचा गंडा

कुलाब्यातील वयोवृद्धेला घातला 22 लाखांचा गंडा

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

विमा पॉलीसीवर अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवत सहा ठगांनी एका 75 वर्षीय वयोवृद्धेला तब्बल 22 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कुलाब्यामध्ये समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन कुलाबा पोलीस तपास करत आहेत.

कुलाब्यातील एस. बी. एस. रोड परिसरात राहात असलेल्या बेहरोज मिस्त्री (75) यांनी नामांकीत वीमा कंपनीत पॉलीसी काढल्या होत्या. सप्टेंबर 2016 पासून ठग आर. एस. रंधवा, अमीत, वर्मा, शुक्‍ला, दुर्गाप्रसाद आणि रणविद्युतकुमार यांनी मिस्त्री यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन संपर्क साधण्यास सुरुवात केली. या ठगांनी त्यांना विमा पॉलिसीमध्ये काही रक्कम भरल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखविले. याच आमिषाला बळी पडून मिस्त्री यांनी पैसे भरण्यास त्यांना होकार दिला. मिस्त्री या आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच ठगांनी त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. मे 2018 पर्यंत ठगांनी त्यांच्याजवळून तब्बल 22 लाख 34 हजार 400 रुपये उकळले.

पैसे भरुनही विम्याची अधिक रक्कम मिळत नसल्याने मिस्त्री यांनी या विमा कंपन्यांकडे चौकशी केली असता ठगांचा हा बनाव उघडकीस आला. अखेर त्यांनी कुलाबा पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरुन वरील सहाही आरोपींविरोधात फसवणूकीच्या भादंवी कलम 419, 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.