Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 5 वर्षांत मुंबईत 22 हेक्टर खारफुटी नष्ट

5 वर्षांत मुंबईत 22 हेक्टर खारफुटी नष्ट

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:31AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई बेटाचं संरक्षण कवच असलेल्या खारफुटीमध्ये 33 टक्के वाढ झाल्याचा दावा केंद्रीय पर्यावरण खात्याने तयार केलेल्या अहवालात करण्यात आला होता. त्यास अवघे काही आठवडे उलटत नाहीत, तोपर्यंत उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने मात्र अवघ्या 5 वर्षांत 22 हेक्टरवरची खारफुटी नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल दिला असल्याने खळबळ उडाली आहे. नष्ट झालेल्या जलपर्णी जंगलावर किमान 15 वानखेडे स्टेडियम्स बसतील असे सांगण्यात येते.   

मुंबईमधील जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने जमेल तेथे मोकळ्या जमिनीवर हात मारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामध्ये भू-माफिया, बाहेरून येणारे लोंढे, गुंड-पुंडांबरोबरच राजकीय नेते-कार्यकर्तेही पाठीमागे नाहीत. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण खात्याने आपल्या 2017 च्या अहवालात मुंबईमध्ये खारफुटी जंगलांमध्ये 33 टक्के वाढ झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, खारफुटीचे संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून त्यामध्ये 2013 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत  22 हेक्टरवरचे खारफुटी जंगल नष्ट झाल्याचे निदर्शनास आणले आहे. नष्ट झालेल्या खारफुटीची ही जागा जवळ जवळ 15 वानखेडे स्टेडियम बसतील इतकी असल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. 

मुंबईमध्ये मालाड-मालवणी व चारकोप भागात खारफुटी जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खारफुटी जंगल नष्ट झालेली जागा ही 15 वानखेडे स्टेडियम बसतील इतकी आहे. मालाड पश्‍चिमेला असलेल्या नेव्हीच्या हमला स्टेशनसमोर 14.2 हेक्टर जागेवर डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर मालाड पश्‍चिमेच्या एव्हरशाईन नगराच्या पाठीमागे 6.25 हेक्टर व कांदिवलीतील चारकोप गावात दीड हेक्टर जागेवर डेब्रिज  टाकून खारफुटी नष्ट करण्यात आले आहे. खारफुटी कशी नष्ट करण्यात आली याचा पुरावा म्हणून 2005 ते 2018 या कालावधीतील सॅटेलाईटद्वारा घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून ती सादर करण्यात आली आहेत.  

केंद्र सरकारने भारतातील जंगलांचा सर्व्हे करून ‘इंडियाज स्टेट ऑफ द फॉरेस्ट रिपोर्ट 2017’  हा अहवाल तयार केला होता. त्यानुसार मुंबईमधील खारफुटी जंगलामध्ये 33 टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामध्ये 2015 पासून मुंबई उपनगरांत 16 चौरस किलोमीटर (1600 हेक्टर्स) इतक्या जागेवर खारफुटी वाढल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले होते. ही वाढ धरून मुंबईत एकूण 64 चौरस किलोमीटर(6400 हेक्टर्स) खारफुटी जंगलाचे क्षेत्र  असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

खारफुटी वाचवण्यासाठी बॉम्बे एन्व्हायरर्न्मेंट अ‍ॅक्शन ग्रुपने पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. जनहित याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने राज्यभरात खारफुटी जंगलांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी  समुद्रापासून 50 मीटर जागेत होणार्‍या बांधकामांवर 2005 मध्येच निर्बंध टाकले होते. वनशक्ती या संस्थेने 2014 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने रेक्‍लमेशनवर निर्बंध आणले होते. वेटलॅण्डवर बांधकाम करण्यासही बंदी घातली होती. मात्र, मुंबईमध्ये त्याचे सरळ सरळ उल्लंघन होत असल्याचेच दिसून येत आहे.