Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २१ %टक्के विद्यार्थी कॉमर्सकडे

२१ %टक्के विद्यार्थी कॉमर्सकडे

Published On: May 13 2018 2:27AM | Last Updated: May 13 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल ओळखून पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कलचाचणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेस बसलेल्या 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. याचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये राज्यातील 21 टक्के विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात रुची असल्याचे दिसून आले. ललित कला क्षेत्रात 18 टक्के, युनिफॉर्मड सेवा 15 टक्के, कृषी 13 टक्के, आरोग्य विज्ञान 12 टक्के, कला 11 टक्के आणि तांत्रिक क्षेत्राकडे 10 टक्के विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

दहावीनंतर पुढे काय, असा प्रश्‍न नेहमीच विद्यार्थ्यांना सतावत असतो. विद्यार्थ्यांला कोणत्या विषयात अधिक रुची आहे, हे शोधण्याचा प्रयत्न कलचाचणी उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. मागील वर्षीच्या कलचाचणी अहवालात ललित कला (फाईन आर्ट) क्षेत्राकडे सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल दिसून आला होता. 

यावर्षी वाणिज्य क्षेत्राकडे (कॉमर्स) सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा कल पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक प्रवेश निश्‍चित करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री तावडे यांनी केले.

आपल्या पाल्याला पुढे नेमके काय करायचे आहे? कोणत्या विषयात अधिक रुची आहे? याबाबत शालेय स्तरावर मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने 12 हजार शासकीय व शासन अनुदानित माध्यमिक विद्यालायांमधील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक असे जवळपास 41,607 शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. पुढील मार्गदर्शनासाठी, विद्यार्थी पोर्टलवर दिलेल्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था केंद्रांशी संपर्क साधू शकतात.

या ठिकाणी पाहता येईल कलचाचणी अहवाल

कलचाचणीचा सविस्तर अहवाल www.mahacareermitra.in वर उपलब्ध आहे. या पोर्टलवर दहावीचा परीक्षा क्रमांकाच्या आधारे कलचाचणी अहवाल पाहता येईल. विद्यार्थ्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे, त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ पाहता येईल, तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ पोर्टलवर उपलब्ध आहेत. 70 हजारहून अधिक शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.